औरंगाबाद : जवाहरनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका व्यक्तीने रात्री ९ वाजेच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेतला. तेव्हा दोन तरुण धावत पळत जवाहरनगर ठाण्यात आले. त्यांनी मदतीची मागणी केल्यानंतर जवाहरनगर ठाण्यातील दोन उपनिरीक्षकासह एका पोलीस कर्मचाऱ्याने घटनास्थळी धाव घेत फासावरील व्यक्तीला खाली उतरवत तात्काळ जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल केल्यामुळे संबंधिताचे प्राण वाचल्याची घटना नुकतीच घडली आहे.
जवाहरनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संताेष पाटील यांच्यासह इतर अधिकारी पोलीस ठाण्यात असताना दोन युवकांनी उत्कानगरी भागातील सद्भावना अपार्टमेंटमध्ये एका व्यक्तीने गळफास घेतला असून, तात्काळ मदतीची गरज असल्याचे सांगितले. त्यानुसार निरीक्षक पाटील यांनी उपनिरीक्षक शिवाजी घोरपडे, अनुराधा पाटील आणि ज्ञानेश्वर शेलार यांना घटनास्थळी पाठवले. या पथकाने अतिशय अडचणीत ठिकाणी चौथ्या मजल्यावरुन ११० किलो वजनाच्या गळफास घेतलेल्या व्यक्तीला खाली आणले. तोपर्यंत ॲम्ब्युलन्स मागविण्यात आली होती.
मात्र, तात्काळ पोहचली नाही. त्यामुळे पोलिसांच्या गाडीतच गळफास घेतलेल्या व्यक्तीला घेऊन जात जवळच असलेल्या सिग्मा हॉस्पीटलमध्ये दाखल केले. त्याठिकाणीही डॉक्टरांनी तात्काळ उपचार सुरु करीत व्यक्तीचे प्राण वाचिवले. या व्यक्तीला शुक्रवारी दवाखान्यातुन सुटी देण्यात आली आहे. या व्यक्तीने पोलीस वेळेवर आले नसते, तर जिव वाचला नसता, अशी प्रतिक्रिया 'लोकमत'शी बोलताना व्यक्त केली. मागील आठवड्यातील पोलिासांनी गळफास घेतलेल्या तिसऱ्या व्यक्तीचे प्राण वाचविण्याचे कार्य केले आहे.