औरंगाबाद : वजन वाढणे, नैराश्य, उत्साहाचा अभाव, चिडचिडेपणा, मासिक पाळीसंदर्भात त्रास, रक्तस्राव, हृदयाची धडधड, अनियमित पाळी इ. लक्षणे दिसत असतील तर कदाचित थायराॅईडचा आजार असू शकतो. मात्र ही लक्षणे दिसली म्हणजे प्रत्येकास थायरॉईड आजार आहे, असे नाही. त्यासाठी तपासणी आवश्यक असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले.
दरवर्षी २५ मे रोजी जागतिक थायरॉईड दिन पाळण्यात येतो. थायरॉईड एक ग्रंथी असून, ती गळ्यात असते. चयापचय क्रिया या ग्रंथीद्वारे नियंत्रित केली जाते. घेतलेल्या आहाराचे ऊर्जेत रूपांतर करण्याचे काम ही ग्रंथी करते. या ग्रंथीत वाढ झाली तर अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. यामुळे शरीरावर दुष्परिणाम जाणवू शकतात. घाटी रुग्णालयात आठवडाभरात तपासणी होणाऱ्या २० पैकी ३ ते ४ रुग्णांना थायराॅईडचे निदान होत आहे.
काय आहेत लक्षणे?‘हायपोथायरॉईडिझ’मध्ये थायरॉईड हार्मोन्सचे रक्तातील प्रमाण कमी होते व वजन वाढणे, थकवा येणे, केस गळणे इ. प्रमुख लक्षणे आढळतात. तर ‘हायपरथायरॉईडिझम’मध्ये थायरॉईड हार्मोन्सचे रक्तातील प्रमाण वाढते. शरीराला कंप सुटणे, दरदरून घाम फुटणे, हृदयाची धडधड वाढणे आणि थायरॉईड ग्रंथीची वाढ ही लक्षणे आढळतात.
थायराॅईडचा परिणामथायरॉईडची समस्या स्त्रियांच्या मासिक पाळीवरही परिणाम करते. सोबतच कोलेस्ट्रॉल वाढून ह्रदयविकार, स्ट्रोक होण्याची अधिक शक्यता असते. रजोनिवृत्तीनंतर महिलांमध्ये थायरॉईडच्या विकारांचे प्रमाण वाढू शकते. वजन वाढण्यासह गर्भधारणेतही अडचणी येत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. वारंवार बद्धकोष्ठतेचा त्रासही थायरॉईडचे एक लक्षण आहे. काही जणांना अधिक भूक लागते, अशी लक्षणे दिसत असतील तर वैद्यकीय सल्ला घ्यावा.
निदानासाठी रक्तचाचणी गरजेचीथायरॉईड ग्रंथीच्या आजाराच्या निदानाकरिता रक्तातील थायरॉईड हार्मोन्स व थायरॉईड स्टिम्युलेटिंग हार्मोन अर्थात टीएसएचचे प्रमाण मोजणे आवश्यक असते. थायरॉईडच्या आजाराचे निदान झाल्यावर नियमित रक्त तपासणी व उपचार अत्यंत आवश्यक असतात. हायपोथायरॉडिझम या समस्येमध्ये नियमित व्यायाम व पोषक आहार घेऊन वजन नियंत्रित ठेवणे आवश्यक असते.- डॉ. रेषा किरण शेंडे, जीवरसायनशास्त्र विभागप्रमुख, घाटी
आजाराचे वाढते प्रमाणपुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये थायराॅईडचे आजार अधिक प्रमाणात आढळतात. हायपोथायराॅईड हा मुख्य प्रकारचा आजार आहे. यात थकवा, झोप, आळस, गळ्यामध्ये सूज, कमी उंची असणे, अनियमित पाळी इ. लक्षणे आढळतात.- डाॅ. नीलेश लोमटे, मधुमेह, हार्मोन्सतज्ज्ञ