औरंगाबाद: सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या स्वागतासाठी चिकलठाणा येथे मोठे क्रेन उभे करून वाहतूक कोंडी करणाऱ्या घटनेची गंभीर दखल पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी घेतली. क्रेन कोणी आणले आणि या कार्यक्रमासाठी परवानगी घेण्यात आली होती का, याबाबत सविस्तर अहवाल त्यांनी पोलीस उपायुक्त परिमंडळ दीपक गिऱ्हे यांच्याकडून मागविला आहे.
सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे हे मंगळवारी चिकलठाणा विमानतळावर जाण्यासाठी औरंगाबादला आले असता राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी चिकलठाणा येथे त्यांच्या स्वागतासाठी भव्य क्रेन आणला होता. क्रेनला लटकवलेल्या मोठा पुष्पहार घालून त्यांचा सत्कार करण्यात आले. या सत्कारासाठी आणलेल्या क्रेनमुळे चिकलठाणा रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली. नागरिकांना विनाकारण वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. याविषयी सविस्तर वृत्त ‘लोकमत’ मध्ये बुधवारी प्रकाशित झाले. या बातमीची दखल घेऊन पोलीस आयुक्त डॉ. गुप्ता यांनी या कार्यक्रमाचा उपायुक्त गिऱ्हे यांच्याकडून अहवाल मागविला आहे.
चुकीचा पायंडा पडेलयाविषयी आयुक्त म्हणाले की, अशाप्रकारे क्रेन रस्त्यावर उभा करून वाहतूक अडविणे योग्य नाही. यामुळे चुकीचा पायंडा पडला जाईल. नागरिकांना विनाकारण त्रास व्हायला नको. हे क्रेन कोणी मागविला होता, याविषयी उपायुक्तांकडून अहवाल मागविला आहे.- डॉ. निखिल गुप्ता, पोलीस आयुक्त