लातूर : कुठे प्रभातफेऱ्या.. कुठे ढोल-ताशांच्या गजरात रॅली.. तर कुठे बैलगाडीतून विद्यार्थ्यांची मिरवणूक काढून शाळेत सोडण्यात आले. उत्साही वातावरणात बुधवारी शाळेचा पहिला दिवस गेला. पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील ३ लाख ५६ हजार विद्यार्थ्यांना मोफत पुस्तकेही वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांना शाळेत सोडण्यासाठी पालकांनीही गर्दी केली होती. लातूर शहरातील बहुतांश शाळांत शिक्षकांनी मुलांचे पुष्प देऊन स्वागत केले. काही विद्यार्थी हसत शाळेत जात होते, तर काही मुलांच्या चेहऱ्यांवर रडू होते. प्रशासनातील अधिकाऱ्यांनी शाळांना भेटी देऊन पहिल्या दिवसाची उपस्थितीही जाणून घेतली.जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी १ ते २ या कालावधीत पेठ जिल्हा परिषद शाळेतील पाच विद्यार्थी, पालक, शिक्षकवृंद व अधिकाऱ्यांशी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अन्य मंत्रिमहोदयांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांना जि.प. शाळा का आवडते, आवडीचे विषय, अभ्यासाविषयी आणखी काय वाटते, आपला छंद कोणता, असे एक ना अनेक प्रश्न विचारले असता विद्यार्थ्यांनी ज्ञानरचनावादातील नाविन्यपूर्ण उपक्रम आवडत असल्याचे सांगितले.पेठ जि.प. शाळेतील चिमुकल्यांनी मुख्यमंत्र्यांना नंदकुमार साहेबांना आमच्या शाळेत कधी पाठविणार, असा थेट प्रश्न केला. तुम्हीही आमच्या शाळेला भेट द्या, अशी विनंतीही मुलांनी मुख्यमंत्र्यांना केली. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले, मी तुमच्या शाळेला लवकरच भेट द्यायला येतो अन् नंदकुमार साहेबांनाही सोबत आणतो.मुख्यमंत्र्यांशी संवाद साधण्यासाठी राज्यातील एकूण पाच शाळांची निवड करण्यात आली होती. त्यात लातूर विभागातून पेठ जिल्हा परिषद शाळेचा समावेश होता. शिवाय, काहींनी एकत्रित बसून कविता म्हणणे, खेळ खेळणे असे सांगत ‘आमची शाळा खूप छान असल्याचे विद्यार्थी मुख्यमंत्र्यांना म्हणाले. यावेळी जि.प.चे सीईओ दिनकर जगदाळे, शिक्षण उपसंचालक व्ही.के. खांडके, शिक्षणाधिकारी संजयकुमार राठोड, गटशिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे, शिक्षण विस्तार अधिकारी शिवाजीराव पन्हाळे उपस्थित होते.
मुलांचे पुष्प देऊन स्वागत...
By admin | Published: June 15, 2016 11:59 PM