- राम शिनगारे
औरंगाबाद - सोशल मीडिया म्हटले की, वेळ वाया घालविण्याचे ठिकाण, तथ्यहिन चर्चा, वादविवादांचा कट्टा. या आभाशी जगात काही नाविन्यपूर्ण उपक्रम होण्याची शक्यताही दुरापास्त बनलेली असते. या प्रभावी माध्यमाचा कोणी सकारात्मक वापर करेल, असे उदाहरण सापडणेही दुरापास्त. मात्र होय, सकारात्मक वापर केला. त्यातून झालेल्या मंथनाचा ग्रंथही तयार झाला. ऐवढेच नाही त्याचे प्रकाशनही मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे झाले आहे.
सोशल मीडियातील विविध माध्यमांचा वापर करताना अनेक सुज्ञ नागरिक, अधिकारी, पदाधिकारी सजग असतात. अनेकजण तर यापासून दुर राहणेच पसंत करतात. बहुतांश वेळी सोशल मीडियाचा वापर कोणाची तरी बदनामी, खोटी माहिती पसरवणे, गुड मॉर्निंग, गुड नाईट, हाय, बाय अशा गोष्टीसाठीच सर्वांधिक केला जातो. यातुन वाद विवाद, दंगली घडल्याचे प्रकारही राज्याच्या विविध भागात घडले आहेत. मात्र सोशल मिडियाचाही सकारात्मक उपयोग होऊ शकतो. व्हॉट्स अॅपचा एक ग्रुप बनवून त्यावर झालेल्या मंथनाचा ग्रंथही निर्माण होऊ शकतो. असे कोणी बोलले, तर त्याला वेड्यात काढले जाईल. हे काय शक्य आहे का? असेही आपण म्हणू शकतो. पण हे सत्यात उतरले आहे. मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे विविध उपक्रम राबविण्यात येतात. प्रतिष्ठानचा एक ग्रुप शिक्षणावर काम करतो. यातूनच सेवानिवृत्त शिक्षण संचालक डॉ. वसंत काळपांडे, माध्यामिक व उच्च माध्यामिक विभागीय शिक्षण मंडळच्या माजी सचिव बसंती रॉय आणि माधव सूर्यवंशी यांनी ‘शिक्षण विकास मंच’ या व्हॉट्स अॅप ग्रुपची स्थापना २ आक्टोबर २०१५ रोजी गांधी जयंतीच्या मुहूर्तावर करण्यात आली. तेव्हा ग्रुपमध्ये केवळ १०० सदस्यांना सहभागी करुन घेता येऊ शकत होते. यामुळे याच नावाचे तीन ग्रुप केले. पुढे एका ग्रुपमध्ये २५६ जणांची मर्यादा झाली.यातून सर्वांचे एकत्रिकरण करण्यात आले. सुरुवातीला अनेक सदस्य अनावश्यक गोष्टी फॉरवर्ड करत होते. मात्र सर्वांना योग्य तो संदेश देत, काही वेळा ग्रुपमधनू रिमूह करत हे प्रमाण कमी केले. पुढे राज्यातील शिक्षणाच्या प्रश्नांवर गंभीरपणे चर्चा होऊ लागली. ज्यांना आवड आहे. ते त्यात हिरारीने सहभागी होत होते. यातुनच सकारात्मक चर्चा होऊ लागल्या. या सर्व चर्चा सेव्ह केल्या. यातुनच आॅक्टोबर २०१६ ते सप्टेंबर २०१७ या वर्षभरातील सकस चर्चेचे पुस्तक तयार झाले आहे.मात्र या कालावधीत झालेल्या चर्चेतुन तब्बल १२ हजार पानांच्या ग्रंथांची निर्मिती होऊ शकत होती. मात्र ग्रंथासाठी पृष्ठ संख्या मर्यादित ठेवणे आवश्यक होते. यातुन काही निवडक चर्चेलाच प्रधान्य देत २२४ पानांचा ग्रंथ यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानने प्रकाशीत केल्याची माहिती मुख्य संयोजक शिक्षणतज्ज्ञ डॉ. वसंत काळपांडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
व्हॉट्स अॅप ग्रुपमध्ये दिग्गजांचा समावेश
‘शिक्षण विकास मंच’ या व्हॉट्स अॅप ग्रुपमध्ये २५६ सदस्य आहेत. यात शिक्षणातील उच्चपदस्थ अधिकारी, तज्ज्ञ, शिक्षक, पत्रकार, लोकप्रतिनिधींचा समावेश आहे. शिक्षणाशिवाय इतर पोस्ट टाकण्याचे प्रमाण शुन्य असल्याचे डॉ. काळपांडे सांगत होते. तसेच या ग्रुपमध्ये झालेल्या चर्चेतुन बोध घेत अधिका-यांनी अनेकवेळा विविध धोरणांमध्ये बदल केल्याचे स्पष्ट झाल्याचेही डॉ. काळपांडे यांनी सांगितले.