औरंगाबाद: राज्यातील सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत दीड कोटीपर्यंतची कामे देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला आहे. ( unemployed engineers will get jobs up to Rs 1.5 crore)
राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांच्या नोंदणीकरणामध्ये वाढ करावी अशी मागणी आ. सतीश चव्हाण यांनी केली होती. यासंदर्भात १६ जून रोजी जीवन प्राधिकरणच्या संचालक मंडळाच्या झालेल्या बैठकीत याबाबतचा प्रस्ताव मान्यतेस्तव सादर करण्यात आला होता. त्याला संचालक मंडळाने मान्यता दिली. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वतीने २ जुलै रोजी यासंदर्भात परिपत्रक प्रसिद्ध केले. सद्यस्थितीत सुशिक्षित बेरोजगार स्थापत्य अभियंत्यांना १५ लाख रुपयांपर्यंतची कामे मिळत होती. मात्र आता मजीप्राच्या कंत्राटदार नोंदणी नियमावलीत सुधारणा केल्यामुळे दीड कोटी रुपयांपर्यंतची कामे मिळणार आहेत.
मागील २० वर्षांपासून सदरील प्रश्न शासन स्तरावर प्रलंबित होता. महाराष्ट्र इंजिनिअर्स असोसिएशनचे पदाधिकारी काही वर्षांपासून यासंदर्भात आ. चव्हाण यांच्याकडे पाठपुरावा करत होते. असोसिएशनचे राज्य महासचिव एम. ए. हकीम, राज्य अध्यक्ष प्रदीप पडोळे, उपाध्यक्ष नारायण चौधरी, दिलीप बाळस्कर यांनी प्रश्न सुटल्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे.