सिल्लोड: तालुक्यातील अनाड गावातील एका शेतकऱ्याने चक्क विहीर चोरीस गेल्याची तक्रार अजिंठा पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली आहे. ही तक्रार पाहून पोलीसही चक्रावून गेले. यानंतर ही तक्रार सोशल मीडियात व्हायरल झाली. अखेर महसूल विभागाने तक्रारीची दखल घेऊन यावर पडदा टाकला.
शेतकरी भावराव रंगनाथ गदाई यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले की, अनाड शिवारातील गट क्रमांक 189 मध्ये 88 आर जमीन आहे. सातबारा नोंदीप्रमाणे शेतात स्वतंत्र विहीर व कूपनलिका (बोअरवेल) आहे. शुक्रवारी सकाळी मी शेतात गेलो असता विहीर आढळून आली नाही. ती चोरी गेली आहे. मी शेतात मिरची लागवड करणार होतो. आता विहिरीची चोरी झाली. यामुळे मी आर्थिक संकटात सापडलो असून विहिरीचा शोध घ्यावा. अशी तक्रार शेतकरी गदाई यांनी पोलीस अधीक्षक, तहसीलदार, अजिंठा पोलीस येथे दाखल केली. यानंतर शुक्रवारी दिवसभर सोशल मीडियावर विहीर चोरी झाल्याची तक्रार व्हायरल झाली. शेवटी या तक्रारीची तहसीलदारांनी दखल घेऊन प्रकरण निकाली काढले.
वर्षभरापासून शेतकरी आहे त्रस्तभावराव गदाई यांनी जानेवारी २०२० मध्ये शेतात बोअरवेल केली होती.त्याची पाहणी करून नोंद करण्यासाठी तलाठी शेतात आले होते. त्यांनी पाहणी करून सातबारावर बोअरची नोंद घेतली पण विहीर नसताना सुद्धा विहिरींची नोंद घेतली. त्यामुळे आता विहिरीची मंजुरी मिळत नाही. यासाठी सातबारावरून विहिरींची नोंद हटवा म्हणून गेल्या वर्षभरापासून भावराव गदाई महसूल विभागात खेट्या घालत आहेत. मात्र, ती नोंद रद्द झाली नाही. यामुळे त्रस्त होऊन भावराव गदाई यांनी विहीर चोरी झाल्याची तक्रार केली.
विहीर मंजूर होत नाही मी अल्पभूधारक शेतकरी आहे व शासनाच्या योजने अंतर्गत मला शेतात विहीर घेयची आहे. मात्र, सातबारावर विहीरीची नोंद असल्याने मला नवीन विहीर मंजूर होत नाही. फाईल एका टेबलवरून दुसऱ्या टेबलवर जात नाही. महसूल विभाग नोंद हटविण्यास तयार नाही आणि शेतात विहीर पण नाही अशा संकटात मी होतो.- भावराव रंगनाथ गदाई शेतकरी अनाड.
ही तर तलाठ्याची चूकसदर शेतकऱ्यांच्या शेतात बोअरवेल आहे. नोंद घेताना तलाठ्याकडून चूक झाली असावी. शेतकऱ्याची तक्रारीची दखल घेऊन सातबारावरुन विहिरींची नोंद हटवली आहे. - विक्रम राजपूत, तहसीलदार सिल्लोड.