औरंगाबाद : राज्य ओल्या आणि कोरड्या दुष्काळाला सामोरे जात असल्याने शेतीला दुहेरी फटका बसत आहे. अतिवृष्टीमुळे पश्चिम महाराष्ट्रासह राज्यातील तब्बल ४ लाख ९ हजार ५१६ हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून, मराठवाड्यात कमी पावसामुळे मूग आणि उडीद पिकाच्या उत्पादनात घट होण्याचा अंदाज आहे.
कोकणात अतिवृष्टीमुळे भात, नाचणी, वरई, भाजीपाला पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. कोल्हापूर विभागात सोयाबीन, भात, मूग, उडिद, मका, बाजरी, ऊस खरीप ज्वारी, भुईमूग, केळी, हळद, घेवडा ही पिके पुरामुळे बाधित झाली आहेत. मराठवाड्यातील औरंगाबाद विभागात बीड जिल्ह्यामध्ये कमी पर्जन्यमानामुळे पिकांच्या वाढीवर परिणाम होत आहे. लातूर विभागात तूर, मका आणि ज्वारी पिके वाढीच्या अवस्थेत असून, येथे पर्जन्यमानाची आवश्यकता असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.
अमरावती विभागातही कमी पर्जन्यमानामुळे मूग आणि उडीदाच्या वाढीवर परिणाम होऊन उत्पादनात घट होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. नागपूर विभागात तुरळक ठिकाणी झालेल्या अतिवृष्टीमुळे भात, कापूस, तूर, सोयाबीन ही पिके बाधित झाली आहेत. मॉन्सूनच्या सुरुवातीला आणि जुलै महिन्यातील दोन आठवडे पावसाने ओढ दिली होती. त्यामुळे भाताच्या क्षेत्रात यंदा सरासरीपेक्षा २४ टक्क्यांनी घट झाली आहे. ज्वारी, मूग, उडीद, भुईमूग, तीळ, कारळे आणि सूर्यफुलाचे क्षेत्रही घटले आहे. सोयाबीनचे सरासरी क्षेत्र साडेपस्तीस लाख हेक्टर असून, त्यात ३९.३१ लाख हेक्टरपर्यंत वाढ झाली आहे. कापसाचे सरासरी क्षेत्र ४१.९१ लाख हेक्टर असून, त्यातही ४३.६३ लाख हेक्टर पर्यंत वाढ झाली.
रोगाचा प्रादुर्भाव राज्यात प्रत्येक विभागात काही ठिकाणी पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. मका आणि ज्वारीवर लष्करी अळीचा, कापसावर गुलाबी बोंड अळी, पाने खाणाऱ्या आणि रस शोषणाऱ्या किडीचा आणि सोयाबीनवर पाने खाणारी व गुंडाळणाऱ्या अळीचा, खोडमाशी, गर्डल बीटल व उंट अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.
मराठवाड्यात दोन दिवसांत पावसाचा जोर वाढणार आगामी काळात महाराष्ट्रात चांगला पाऊस होण्याची शक्यता असून, दोन दिवसांत विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा जोर वाढण्याची अपेक्षा आहे. तर गुरुवारी मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी मध्यम सरींची शक्यता स्कायमेटने वर्तवली आहे. स्कायमेटकडून मिळालेल्या माहितीनुसार, मराठवाड्यात अजूनही २४ टक्के पावसाची कमतरता आहे.