- मुजीब देवणीकर
औरंगाबाद : महापालिकेच्या शाळांमध्येही गुणवंत विद्यार्थी घडावेत यादृष्टीने प्रशासनाने विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा लावली होती. दहावीत ९० टक्क्यांहून अधिक गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी ५० हजार रुपयांचे रोख बक्षीस देण्याचे घोषित केले होते. तीन वर्षे उलटली तरी एकाही गुणवंताला मनपाने बक्षीस दिले नाही. उलट ‘फुलांनी तुमचा सत्कार केला, हेच खूप झाले’ म्हणून त्यांची थट्टा करण्यात आल्याचा संतापदायक प्रकार समोर आला आहे.
महापालिकेच्या बहुतांश शाळा पूर्वी आठवीपर्यंतच होत्या. पालक आणि विद्यार्थ्यांच्या मागणीवरून महापालिकेने दहावीपर्यंत शिक्षण देणे सुरू केले. गुणवत्ता यादीत एकही विद्यार्थी झळकत नव्हता. ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण घेणारा मनपाचा एकही विद्यार्थी नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये निकोप स्पर्धा घेण्याचे प्रशासनाने निश्चित केले. ९० टक्क्यांहून अधिक गुण घेणाऱ्या विद्यार्थ्याला ५० हजार रुपयांचे रोख बक्षीस देण्यात येईल, असे जाहीर केले. २०१६-१७ या शैक्षणिक वर्षामध्ये तब्बल सहापेक्षा अधिक विद्यार्थी ९० टक्क्यांहून अधिक गुण घेऊन उत्तीर्ण झाले. महापालिकेने त्यांचा गौरव करून रोख बक्षीसही प्रत्येकी दिले. २०१७-१८ या शैक्षणिक वर्षात नारेगाव मनपा शाळेच्या उर्दू आणि मराठीतील सर्वाधिक विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांहून अधिक गुण संपादन करून बक्षिसावर दावा केला.
आठ ते दहा विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. या विद्यार्थ्यांच्या पालकांनी अगोदर शाळेकडे बक्षिसाचा तगादा लावला. सर्वसामान्य गोरगरीब कुटुंबातील हे विद्यार्थी असल्याने पुढील शिक्षणासाठी हातभार लागेल म्हणून पालकांनी मनपा प्रशासन, महापौर, नगरसेविका यांचे उंबरठे झिजविणे सुरू केले. २०१७-१८ यावर्षापासून मनपाने बक्षीस देणे बंद केल्याचे विद्यार्थी पालकांना सांगण्यात आले. शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी यांनी विद्यार्थी, पालकांना सांगितले की, ‘तुमचा फुलांनी सत्कार केला, हेच खूप झाले’ बक्षीस वगैरे काहीच मिळणार नाही. मनपाने विद्यार्थ्यांसोबत उघडपणे भेदभाव केल्याचा आरोप आता पालकांनी केला आहे. मनपा प्रशासन बक्षीस देणार नसेल तर आम्ही लोकशाही मार्गाने मनपासमोर उपोषण करणार असा इशाराही पालकांनी दिला आहे.
आता फक्त कौतुक होणार...पहिल्या वर्षी गुणवंत विद्यार्थ्यांना प्रत्येकी ५० हजार रुपयांप्रमाणे बक्षीस दिले. ८९.९ टक्के गुण घेणाऱ्याला बक्षीस दिल्या जात नव्हते. एका मार्कसाठी आमच्या मुलावर अन्याय का? असा प्रश्न पालक उपस्थित करीत होते. त्यामुळे आयुक्तांच्या सूचनेनुसार बक्षीस देणे बंद केले. विद्यार्थ्यांचे फक्त कौतुक केल्या जाते. विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव नको म्हणून बक्षीस देणे बंद केले.- श्रीकांत कुलकर्णी, शिक्षणाधिकारी मनपा