औरंगाबाद : घाटी रुग्णालयातील वाॅर्ड क्रमांक -१३ मध्ये ३ निवासी डाॅक्टरांना रुग्णाच्या नातेवाईकांनी मंगळवारी रात्री मारहाण केली. रुग्णाच्या बेडखाली औषधी आणि इतर साहित्य ठेवण्याचा स्टुल ठेवल्याच्या कारणावरून आधी परिचारिकेसोबत शाब्दिक वाद झाला. त्यानंतर निवासी डाॅक्टरांसोबत वादावादी होऊन ६ ते ७ नातेवाईकांनी मारहाण (Patient's relatives beat up 3 resident doctors) केल्याचा आरोप डाॅक्टरांनी केला.
शहानूरवाडी येथील ५० वर्षीय रुग्ण अस्थिव्यंगोपचार विभागाच्या वाॅर्ड क्र.१३ मध्ये दाखल आहे. या रुग्णासाठी नातेवाईकांनी डोक्याच्या बाजूने उंच होणाऱ्या बेडची मागणी केली होती. यात बेडखाली स्टुल ठेवल्यावरून नातेवाईक आणि परिचारिकेत रात्री ८ वाजेच्या सुमारास शाब्दिक वाद झाला. ही बाब लक्षात येताच ३ निवासी डाॅक्टर त्यांच्याकडे गेले. तेव्हा नातेवाईक आणि निवासी डाॅक्टरांमध्येही जोरदार वाद झाला. काही वेळातच वादाचे रुपांतर मारहाणीत झाले. नातेवाईकांनी एका डाॅक्टराच्या कानशिलात लगावली. इतर दोन डाॅक्टरांनाही नातेवाईकांनी धक्काबुक्की केली. या प्रकारानंतर संतप्त झालेल्या निवासी डाॅक्टरांनी सर्जिकल इमारतीतील अत्यावश्यक सेवा वगळता इतर ठिकाणी कामबंद केले. सर्व निवासी डाॅक्टर आणि मार्ड संघटनेचे पदाधिकारी वैद्यकीय अधीक्षक कार्यालयासमोर एकत्र जमले. माहिती मिळताच अधिष्ठाता डाॅ. वर्षा रोटे, उपअधिष्ठाता डाॅ. श्रीनिवास गडप्पा, अस्थिव्यंगोपचार विभागप्रमुख डाॅ. एम. बी. लिंगायत, पोलीस निरीक्षक प्रशांत पोतदार यांनी घाटीत धाव घेतली. जोपर्यंत योग्य कारवाई होत नाही, तोपर्यंत कामावर परतणार नाही, असा पवित्रा निवासी डाॅक्टरांनी घेतला. वरिष्ठांच्या आश्वासनानंतर काही वेळाने आंदोलन स्थगित करत डॉक्टर कामावर परतले.
बाॅऊन्सर द्या, सुरक्षारक्षक केवळ बघेघाटीत बाॅऊन्सर नेमा, अलार्म सिस्टीम बसवा. सुरक्षारक्षक केवळ बघ्याची भूमिका घेतात. त्यामुळे डाॅक्टरांना वारंवार मारहाणीचे प्रकार होत आहेत,असा आरोप निवासी डाॅक्टरांनी केला. घाटीत डाॅक्टरांना मारहाणीच्या यापूर्वी २०१८ मध्ये चार तर वर्ष २०१९ मध्ये एक घटना घडली आहे. निवासी डाॅक्टरांच्या मागणीच्या दृष्टीने योग्य ते पाऊल उचलण्यात येईल, असे अधिष्ठाता डाॅ. वर्षा रोटे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
गुन्हा दाखल करण्यावरून मतभेदयाप्रकरणी गुन्हा दाखल करण्यावरून वरिष्ठ डाॅक्टरांमध्ये मतभेद दिसले. एका वरिष्ठ डाॅक्टरांनी सुरक्षारक्षक, सीएमओंच्या माध्यमातून गुन्हा दाखल करावा, असा सल्ला दिला. तर प्रकरण पुढे वाढवू नका, उपाययोजना केल्या जातील, असा सल्ला अन्य एका वरिष्ठ डाॅक्टरांनी दिला.