औरंगाबाद : देशभरातील दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येत्या परीक्षेतील ताण हलका होण्यासाठी दिल्लीतील तालकटोरा मैदानावर सोमवारी ‘परीक्षा पे चर्चा’ केली. यात कन्नड येथील नवोदय विद्यालयातील १२ वीतील विद्यार्थिनी प्रेरणा मनवर हिने पंतप्रधानांना दिवसभरात अभ्यास करण्याची योग्य वेळ कोणती? असा प्रश्न विचारला. यावर पंतप्रधानांनीही तेवढ्याच दिलखुलासपणे उत्तर देत तिचे समाधान केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मागील तीन वर्षांपासून दहावी, बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधत आहेत. यावर्षीही देशभरातील विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याचा उपक्रम सोमवारी दिल्लीत आयोजित केला होता. यासाठी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने ‘माय गव्ह’ या संकेतस्थळावर नववी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी लघु निबंध स्पर्धा आयोजित केली होती. यात निवडक विद्यार्थ्यांची कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी आणि संवाद साधण्यासाठी निवड करण्यात आली होती. यामध्ये कन्नड येथील नवोदय विद्यालयातील विद्यार्थिनी प्रेरणा मनवर हिचा समावेश होता.
याच विद्यालयातील ११ वीचा विद्यार्थी अर्जुन थोरात याला दिल्लीतील कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची संधी मिळाली. प्रेरणा मनवर हिने पंतप्रधानांना माझे आई-वडील पहाटे लवकर उठून अभ्यास करण्यासाठी सांगतात. मात्र मला सायंकाळी अभ्यास करण्यास आवडतो. त्यामुळे दिवसभरात अभ्यास करण्यासाठी योग्य वेळ कोणती? हे विचारले. यावर पंतप्रधान मोदी म्हणाले, आपल्याला अभ्यासाची जबाबदारी स्वत:कडे घेऊन त्यानुसार अभ्यास करण्याच्या सवयींमध्ये बदल घडवावा लागेल. यासाठी परीक्षेचे दडपण येऊ न देता आत्मविश्वासाने सामोरे गेले पाहिजे. विद्यार्थी बनून सतत नवनवीन गोष्टी शिकणे, हाच जीवन जगण्याचा योग्य मार्ग आहे. आयुष्यात काहीतरी होण्याऐवजी काहीतरी करण्याचे स्वप्न पाहा, असा सल्लाही पंतप्रधानांनी प्रेरणाला दिला. पंतप्रधानांनी दिलेल्या उत्तरामुळे प्रेरणासह तिचे कुटुंबीय आनंदी झाले होते. पंतप्रधान बोलले हा आयुष्यातील महत्त्वाचा क्षण असल्याचेही तिने सांगितले.
औरंगाबादेतील पाच विद्यार्थी दिल्लीतपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘परीक्षा पे चर्चा’ या उपक्रमात सहभागी होण्यासाठी निबंध स्पर्धा आयोजित केली होती. या निबंध स्पर्धेत औरंगाबाद शहरासह जिल्ह्यातील पाच विद्यार्थी दिल्लीतील तालकटोरा मैदानात आयोजित कार्यक्रमाला उपस्थित होते. यामध्ये कन्नड येथील नवोदय विद्यालयाचा विद्यार्थी अर्जुन थोरात याच्यासह नचिकेत पाटील, जय जगदीश पारीख, श्रेयस मयूर पांडव, जयेश राजेंद्र खोमणे या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.