औरंगाबाद ः बारावीच्या परीक्षेवर शासन विचार करत आहे. विविध परीक्षा मंडळांचे केवळ विचारमंथन सुरू आहे. यात बारावी परीक्षेवर पर्याय काय ? याचा देशभर खल सुरू असताना विद्यार्थी मात्र संभ्रमात आहेत. परीक्षा होईल का नाही, याची चिंता पालकांसह शिक्षकांनाही सतावत असून, परीक्षा व्हावी. कोरोनामुळे अडचण असल्यास महत्त्वाच्याच विषयांची परीक्षा घेतली जावी, पण परीक्षा व्हावी, असे मत शिक्षणतज्ज्ञ, विद्यार्थ्यांतून व्यक्त होत आहे.
बारावीचे वर्ग सुरुवातीला ऑनलाइन, मध्यंतरी ऑफलाइन त्यानंतर ऑनलाइन झाले. त्यातून बारावीचा अभ्यासक्रम, प्रात्यक्षिक झाले. विद्यार्थ्यांनी परीक्षेची तयारी केली. मेहनत घेतली. कोरोनामुळे पेपरमधील गॅप कमी करुन कोअर विषयांची परीक्षा व्हावी. शक्य झाल्यास ऐच्छीक विषयांचीही परीक्षा व्हावी. परीक्षा व्हायलाच हवी. पालक, विद्यार्थ्यांत बारावीच्या परीक्षेवरून मानसिक तणाव आहे. सर्व तयारी विद्यार्थ्यांनी केली आहे. कोरोनाची काळजी घेऊन व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशांत अडचणी येणार नाही, याचाही विचार शासनाने करणे गरजेचे आहे. बारावीच्या कागदपत्रांना पुढे पदवी अभ्यासक्रमात अनन्यसाधारण
महत्त्व आहे. त्यामुळे परीक्षा घेताना शक्य असेल तर काळजी म्हणून डाॅक्टरांचे भरारी पथक, मास्क, सुरक्षित अंतर, सॅनिटायझरची काटेकोर अंमलबजावणी करून परीक्षा घ्यावी. परीक्षेची तयारी करण्यासाठी दोन आठवड्यांचा अवधी पुरेसा आहे. त्यामुळे लवकर निर्णय घेतल्यास परीक्षा लवकर होऊन निकाल लवकर लावता येतील. जेणेकरून विद्यार्थ्यांना पुढील अभ्यासक्रमाला प्रवेशासाठी उशीर होणार नाही, असे मिलिंद विज्ञान महाविद्यालयाचे ज्येष्ठ प्राध्यापक प्रदीप कापकर म्हणाले.
---
जिल्ह्यातील बारावीचे एकूण विद्यार्थी -६३,२१५
मुले -३६,९७७
मुली -२६,२३८
---
काय असू शकतो पर्याय?
बारावीच्या परीक्षा झाल्याच पाहीजे. कला, वाणिज्य, विज्ञान शाखेचे मुख्य विषयांची परीक्षा घ्यावी. ज्यावरून विद्यार्थ्यांचा कल कळू शकेल. या विषयांची परीक्षा मर्यादीत वेळेत होईल, प्रश्नांचे स्वरुप बदलून परीक्षा घेतली गेली पाहिजे. परीक्षा रद्द करणे हा पर्याय विद्यार्थ्यांसाठी घातक ठरेल. यासंबंधी निर्णय लवकर होऊन सीबीएसईने अग्रणी भूमिका बजावली पाहिजे. त्या गाइडलाईन्स देशभरासाठी कामी येतील; पण परीक्षांचा निर्णय लवकर घेऊन परीक्षा घेतलीच पाहिजे.
-अनिल देशमुख, मुख्याध्यापक, जि. प. प्रशाला गणोरी
---
विज्ञान शाखेचे मुख्य पाच विषय, कला आणि वाणिज्य शाळेचे मुख्य चार विषयांची परीक्षा घेतली पाहिजे. ऐच्छिक विषयांची परीक्षा न घेता अंतर्गंत गुणदान केले तरी चालू शकते. असे केले तर पंधरा दिवसांत परीक्षा संपू शकेल. परीक्षा झालीच पाहीजे अन्यथा उच्च शिक्षणात विद्यार्थ्यांना अडचणी येतील. निर्णय लवकर व्हावा. निकालही लवकर लावता येईल. इतर राज्यांपेक्षा सीबीएसईपेक्षा राज्य बोर्डाचे विद्यार्थी राज्यात जास्त असल्याने सीबीएसई सोबत निर्णय घेणे संयुक्तीक होणार नाही
-रजनीकांत गरुड, उपप्राचार्य, देवगीरी महाविद्यालय,औरंगाबाद
-
बारावीची परिक्षा विद्यार्थ्यांच्या पुढच्या भविष्यासाठी महत्वाची आहे. महत्वाचे विषयांची परिक्षा घ्यावी. इतर ऐच्छिक विषयांचे अंतर्गत मुल्यांकन व्हावे. कोरोनाचा धोका अधिक आहे. सध्या विद्यार्थ्यांचे लसीकरण झालेले नाही. त्यामुळे परिक्षा कालावधी कमी करणे गरजेचे आहे. विद्यार्थीसंख्या अधिक असल्याने आॅनलाईन घेणे शक्य होणार नाही. त्यामुळे शहरी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा निर्णय व्हावा. विद्यार्थ्यांच्या स्वप्नांवर परिणाम होणार नाही, याचा निर्णय घेतांना विचार व्हायला पाहीजे.
-मंगल मुरंबीकर, उपप्राचार्य, विवेकानंद महाविद्यालय, औरंगाबाद
---
विद्यार्थी संभ्रमात...
परिक्षेसंदर्भात निर्णय लवकर झाला पाहीजे. दररोज वेगवेगळ्या घडामोडी कळताहेत. त्यात संभ्रम वाढला आहे. अभ्यास करतोय ती मेहनत वाया जाऊ नये. तसेच पुढचे सत्रही लांबू नये यासाठी परिक्षांच्या तारखा लवकर जाहीर व्हाव्यात
-दिक्षा जाधव, विद्यार्थीनी
---
कोरोनामुळे आधीच महत्वाचे वर्ष असतांना प्रत्यक्ष वर्गात फार कमी शिकता आले. स्वाध्याय आणि ऑनलाइनच्या माध्यमातून मेहनत केली. आता परिक्षा लवकर घेवून निकाल लवकर लागला पाहीजे. परंतू अद्याप निर्णय होत नसल्याने धाकधूक वाढली आहे. लवकर काहीतरी निर्णय शासनाने घेतला पाहीजे.
-शाकीर देशमुख, विद्यार्थी
---
बारावीवर पुढील पुर्ण शिक्षणाची भिस्त आहे. बारावीच्या परिक्षेची कागदपत्रे पुढील व्यावसायिक शिक्षणात वेळोवेळी गरजेची असतात. त्यामुळे परिक्षा व्हावी. पुढील प्रवेश प्रक्रीयेत काही अडचणी तर येणार नाहीत ना याचे टेन्शन सतावतेय.
-प्रतिक पवार, विद्यार्थी
---