छत्रपती संभाजीनगर : हल्ली आजारांमध्ये संधिवात या आजाराविषयी कायम बोलले जाते. खूप जणांना हा आजार असल्याने हा शब्द कायम कानावर पडत आहे. संधिवात म्हटले तर म्हातारपणीच होणारा आजार, असा अनेकांचा समज असेल. हा त्रास काही ज्येष्ठांपर्यंतच मर्यादित राहिलेला नाही. तरुणांसह अगदी ५ वर्षांच्या बालकांमध्येही संधिवात आढळतो. शिवाय संधिवाताचे एक-दोन नव्हे, तब्बल २५ हून अधिक प्रकार असल्याचेही तज्ज्ञांनी सांगितले.
दरवर्षी १२ ऑक्टोबर हा दिवस जागतिक संधिवात दिन म्हणून पाळला जातो. सर्वसामान्यांमध्ये जागरूकता निर्माण करणे, हा यामागील उद्देश आहे. संधिवात म्हणजे सांध्यांच्या आतमधून आलेली सूज आणि ठणक. या संधिवाताचे अनेक प्रकार आहेत. यात प्रामुख्याने रुमेटाइड आर्थरायटिस, पाठीच्या मण्याचा संधिवात, (आंक्यलोसिंग स्पॉन्डिलाइटिस), गुडघ्याची झीज, वेवेगळ्या रक्तवाहिन्यांची सूज, चामडी जाड आणि कडक होणे आदी प्रकार आहेत.
संधिवाताची लक्षणेसंधिवाताच्या प्रकारानुसार याची विविध लक्षणे दिसून येतात; परंतु याची प्रमुख पाच लक्षणे आहेत. यात सांधेदुखी, सांध्यांमध्ये जाणवणारी ताठरता, सूज, सांध्यांजवळचा भाग लाल होणे, चालण्या-फिरण्यात किंवा हालचाल करण्यात येणारा अडथळा आदी लक्षणे आहेत. आरोग्यादायी जीवनशैलीसह वजन नियंत्रणात ठेवणे, पुरेशी झोप घेणे महत्त्वाचे ठरते.
‘घाटी’त संधिवातासाठी स्पेशल ओपीडी, माहीत आहे?घाटी रुग्णालयात दर बुधवारी संधिवाताच्या रुग्णांसाठी विशेष ओपीडी चालविली जाते. या ठिकाणी किमान ४० ते ५० रुग्ण उपचारासाठी येतात. यात लहान मुलांपासून ज्येष्ठांचा समावेश असतो.
वेळेवर उपचार महत्त्वाचासंधिवातावर वेळेवर उपचार घेणे महत्त्वाचे ठरते. वेळेवर उपचार घेतल्याने सांधे खराब होण्याचा धोका टळतो, सांधे बदलण्याची वेळ येत नाही. केवळ वृद्धांनाच नाही, तर लहान मुलांमध्येही संधिवात आढळतो. संधिवात का होतो, याचे मूळ एक असे कुठलेही कारण नाही.- डाॅ. अमोल राऊत, संधिवाततज्ज्ञ
...तर पाठीत बाकमणक्याचा वात अतिशय सामान्य आहे व कमी वयात होतो. याला ‘आंक्यलोसिंग स्पॉन्डिलाइटिस’ असे म्हणतात. आराम केल्यास किंवा सकाळी उठल्यावर पाठीत ताठरपणा येणे व टाचा दुखणे अशी प्रमुख लक्षणे आहेत. योग्य वेळेस निदान व उपचार न झाल्यास पाठीत बाक पडत जातो.- डॉ चंद्रशेखर गायके, ऑर्थोपेडिक आणि एंडोस्कोपिक स्पाइन सर्जन