औरंगाबाद : कृत्रिम पावसासाठी ख्याती वेदर मॉडिफि केशनच्या विमानाने १२ आॅक्टोबरपर्यंत उड्डाणावर उड्डाण घेतले, त्यातून हाती काय लागले हे अद्याप महसूल प्रशासन आणि शास्त्रज्ञांकडून स्पष्ट करण्यात आलेले नाही. पडलेला पाऊस हा कृत्रिम होता की नैसर्गिक, याचेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. त्यामुळे सगळे काही हवेत असल्याप्रमाणेच आहे.
३० कोटी रुपयांतून हा प्रयोग करण्यात सुरू आहे. आॅक्टोबर संपत आला तरी अजून प्रयोगाची सांगता झालेली नाही. कृत्रिम पावसासाठी प्रयत्न केले गेले तरी त्यातून खूप काही हाती लागलेले नाही. विभागात आणि मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत ९ आॅगस्टपासून प्रयोगासाठी विमानाने उड्डाण करीत रसायनांची फवारणी केली जात आहे. ७८ दिवसांत २६ दिवस प्रयोग झाला नाही. विमान व पायलटस्ने रेस्ट डे किंवा पाणीदार ढग नसल्याच्या कारणाने उड्डाण घेतले नाही. निवडणूक आचारसंहितेच्या काळात सरकारी यंत्रणेने कृत्रिम पावसाच्या प्रयोगाकडे लक्ष दिले नाही.
कृत्रिम पावसाच्या प्रयोगाला ९ आॅगस्ट रोजी सुरुवात झाली. १६ आॅगस्टपासून विमानाचे प्रयोगासाठी नियमित उड्डाण झाले. १६ आॅक्टोबर रोजी ६० दिवस झाले. ८ दिवस सुटीचे वगळले, तर ८ आॅक्टोबरलाच ५२ दिवस संपले. ९ आॅगस्टपासून हिशोब केला, तर आजवर ७८ दिवस प्रयोग झाल्याचे दिसते. ९ आॅगस्ट ते १ सप्टेंबर १४३ फ्लेअर्स, १ सप्टेंबर ते १२ आॅक्टोबरपर्यंत ३४१ फ्लेअर्स विमानातून कृत्रिम पावसासाठी ढगांमध्ये सोडण्यात आले.
औरंगाबाद, अहमदनगर, जालना, परभणी, बीड, बुलडाणा, सोलापूर या जिल्ह्यांतील गावांवरील पाणीदार ढगांमध्ये प्रयोग करण्यात आला. त्यातून किती पाऊस झाला, याची माहिती अद्याप उपलब्ध करून देण्यात आलेली नाही.प्रयोग कधी थांबणार?शासनाकडून प्रयोग बंद करण्याबाबत अद्याप काहीही सूचना आलेल्या नाहीत. ज्यादिवशी प्रयोग बंद करण्याबाबत अधिकृत सूचना येतील, त्यादिवशी सर्वांना कळविण्यात येईल, असे विभागीय उपायुक्त पराग सोमण यांनी सांगितले.