औरंगाबाद : हातगाडी चोरण्यासाठी आला का, असा सवाल करीत चारजणांनी एकास रणमस्तपुरा येथे सोमवारी सकाळी बेदम मारहाण केली. या मारहाणीत रेकॉर्डवरील आरोपी असलेल्या युवकाचा मृत्यू झाला. या प्रकरणी सिटी चौक ठाण्यात मृृत्यूस कारणीभूत ठरल्याचा चारजणांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आल्याची माहिती वरिष्ठ निरीक्षक अशोक गिरी यांनी दिली.
शेख उस्मान ऊर्फ अजीम नाजीम शेख (वय ३२, रा. कैसर कॉलनी) असे मृताचे नाव आहे. शेख फहीम शेख बाबू, शेख कलीम शेख बाबू (दोघे रा. बाबर कॉलनी, कटकटगेट), मोहम्मद अथर शेख अफसर (रा. अबरार कॉलनी, मिसरवाडी) आणि शेख राजेक शेख अतिक (रा. एस.टी. कॉलनी, फाजलपुरा) अशी चार आरोपींची नावे आहेत. मृताचे वडील शेख नजीम यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शेख उस्मान हा मित्र फेरोज खान असमत खान दुर्राणी याच्यासोबत सोमवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास सबाहत हॉस्पिटलजवळच्या मेडिकलमध्ये औषध घेण्यासाठी गेला. तेव्हा त्याला चारजणांनी हातगाडी चोरण्यासाठी आलास का, अशी विचारणा करीत बेदम मारले. सोबतचा मित्र फेरोज खान याने मारहाण करणाऱ्यांना अडविण्याचा प्रयत्न केला असता, त्यासही चौघांनी मारहाण केली. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलीस आल्यानंतर गंभीर जखमी उस्मानला घाटी रुग्णालयात पोलिसांच्या वाहनातून नेण्यात आले. डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. अधिक तपास उपनिरीक्षक गजानन इंगळे करीत आहेत.
आरोपींना अटक, तीन दिवसांची कोठडीसिटी चौक पोलिसांनी मारहाण करणाऱ्या चौघांना ताब्यात घेतले होते. मृताच्या वडिलांनी तक्रार दिल्यानंतर गुन्हा नोंदवला. यानंतर चारही आरोपींना अटक करण्यात आली. या आरोपींना मंगळवारी न्यायालयात हजर केले असता, तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आल्याचे निरीक्षक अशोक गिरी यांनी सांगितले.