"पटोले भाजप सोडून गेले तो दिवस आम्ही काय म्हणून समजायचा"; चव्हाणांचा जोरदार पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2024 04:46 PM2024-08-14T16:46:34+5:302024-08-14T16:47:30+5:30
काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष निवडणुकांबाबत चुकीचे विधान करतात, ही केविलवाणी गोष्ट आहे. त्यांना वाचायची सवयच नसल्यामुळे असं होत आहे. : अशोक चव्हाण
छत्रपती संभाजीनगर: लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसला सूज आली असून ती लवकरच उतरेल. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना कायद्याचे ज्ञानच नाही. काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष निवडणुकांबाबत चुकीचे विधान करतात, ही केविलवाणी गोष्ट आहे. त्यांना वाचायची सवयच नसल्यामुळे असं होत आहे. पटोले यांना आठवण करून द्यायची आहे की, ते जेव्हा भाजप सोडून गेले तो दिवस आम्ही काय म्हणून समजायचा. माझ्या भाजपात जाण्याबाबत टीका करण्याचा त्यांना नैतिक अधिकार नाही, असा जोरदार पलटवार भाजपाचे राज्यसभा खा. अशोकराव चव्हाण यांनी केला. ते मंगळवारी आयएमए हाॅल येथे भाजपा पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी बोलत होते.
महायुतीचे सरकार पुन्हा आले तरच लाडकी बहीण योजनेसह इतर योजना टिकतील. असा प्रसार भाजपा कार्यकर्त्यांनी जनतेत जाऊन करावा. मराठा समाजाला १० टक्के आरक्षण लागू करण्यासह दिलेल्या विविध लाभांची उजळणी देखील जनतेत जाऊन करावी,असे आवाहन चव्हाण यांनी भाजपा पदाधिकारी, कार्यकर्त्यांना केले. विरोधकांना योजना यशस्वी होतील यांची भीती वाटते आहे. त्यामुळे ते काहीही बिनबुडाचे आरोप करीत आहेत. भाजपा, शिंदेसेना, पवार गट आम्ही तिघे एकत्र असून तिघांनी योजनांचे श्रेय घेणे काही चुकीचे नसल्याचेही त्यांनी नमूद केले.
सरचिटणीस दीपक ढाकणे यांनी प्रास्ताविक केले. खा. डॉ. भागवत कराड, शहराध्यक्ष शिरीष बोराळकर, लक्ष्मीकांत थेटे, भगवान घडमोडे, अनिल मकरिये, एजाज देशमुख, जालिंदर शेंडगे, रामेश्वर भादवे, मनीषा मुंडे आदींची उपस्थिती होती.
मराठा समाजापर्यंत जाण्यास कमी पडलो....
शासनाने मराठा आरक्षणासाठी काय केले, हे सांगण्यात कमी पडलो. १० टक्के आरक्षण मिळाले. उच्चशिक्षणासाठी त्याचा लाभ सुरू झाला आहे. ज्यांच्याकडे कुणबी रेकॉर्ड आहे. त्यांना प्रमाणपत्र मिळत आहेत. मनोज जरांगे यांना मी चार वेळा भेटलो. त्यांचे काही विषय असतील त्यावर चर्चा करण्यासाठी शासन तयार आहे. विधानसभा निवडणुकीपर्यंत मराठा आरक्षण प्रकरण शांत होईल काय, ते काही सांगता येत नाही.
खा. राऊत म्हणजे तात्पुरती करमणूक...
खा. संजय राऊत यांनी लाडकी बहीण योजनेवर केलेल्या टीकेवरून चव्हाण म्हणाले, देशात आणि राज्यात सक्षम नेतृत्व कोणाचे आहे, हे लोकांना माहिती आहे. राऊत यांच्या वक्तव्यामुळे तात्पुरती करमणूक होते. मात्र, त्यामुळे त्यांना मतं मिळणार नाहीत.
लोकसभेची पुनरावृत्ती होणार नाही..
लोकसभेची परिस्थिती वेगळी होती तीच परिस्थिती विधानसभेला राहील अशी शक्यता नाही. पुन्हा लॉटरी लागेल अशी अपेक्षा पटोले यांना असेल. देशात तिसऱ्यांदा मोदींच्या नेतृत्वात सरकार स्थापन झाल्यामुळे लोकसभेची पुनरावृत्ती होणार नाही. मराठवाड्यात भाजपाला किती जागा वाट्याला येतील, यावर मी काहीही चर्चा केलेली नाही. शिंदेसेना, पवार गट आणि भाजप नेत्यात चर्चा होऊन जागावाटप निर्णय होईल. मतदारसंघातील प्राबल्याचा विचार होईल.