- संतोष हिरेमठऔरंगाबाद : सिग्नलशी छेडछाड करून एखादी रेल्वे कशी थांबविता येईल, याचे धडेच इंटरनेटवर व्हिडिओच्या माध्यमातून दिले जात आहेत. रेल्वेचे सिग्नल कसे काम करते, कोणकोणत्या बाबींमुळे रेल्वे थांबू शकते, याची विस्तृतपणे माहिती देणारे अनेक व्हिडिओ पहायला मिळत आहेत. देवगिरी एक्स्प्रेसवरील दरोड्यासाठी इंटरनेटवरील अशाच व्हिडिओंची मदत घेण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मुंबईकडे जाणाऱ्या देवगिरी एक्स्प्रेसवर पोटूळ रेल्वे स्टेशनजवळ दरोडा पडल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री घडली. यापूर्वी याच जागेवर अशा प्रकारे तीन रेल्वे थांबविण्यात आल्या. सिग्नल यंत्रणेशी संबंधित असलेली केबल कट करायची, त्यानंतर इमर्जन्सी सिग्नलवर कपडा टाकायचा, अशी क्लृप्ती दरोडेखोरांनी प्रत्येक वेळी वापरली आहे. लोहमार्ग पोलीस आणि रेल्वेसुरक्षा बलाकडून या प्रकरणाचा तपास केला जात आहे. तपासात सिग्नल यंत्रणेची माहिती कोणाला असते, याची पडताळणी करण्यात येत आहे. यादरम्यान इंटरनेटवर रेल्वेच्या सिग्नलविषयी माहिती देणारे व्हिडिओ असल्याचे रेल्वे सुरक्षा बलाच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास पडले आहे. एक दाेन नव्हे तर अनेक व्हिडिओ आहेत. हे व्हिडिओ पाहून रेल्वेच्या सिग्नलच्या यंत्रणेची माहिती घेऊन त्याच्याशी छेडछाड करू शकत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. त्यामुळे ही बाब वरिष्ठ कार्यालय आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात आली आहे.
‘एक्स्पर्ट’चा शोध सुरूरेल्वेच्या ‘टीएलजी’ बाॅक्समधील केबल कट केल्यानंतर अवघ्या दोन मिनिटांत इमर्जन्सी सिग्नल लागते. ही बाबही इंटरनेटवरील व्हिडिओत सांगितली जात आहे. त्यामुळेच इमर्जन्सी सिग्नलवर कपडा बांधला की, रेल्वे थांबते, ही बाब दरोडेखोरांना माहिती आहे. दरोड्यात रेल्वेच्या तांत्रिक बाबींची माहिती असणारा ‘एक्स्पर्ट’ त्यांच्यात सहभागी असावा, अशी शक्यता वर्तविण्यात आली. त्याबरोबर आता इंटरनेटच्या माध्यमातून व्हिडिओपासूनही दरोडेखोरांनी ही बाब आत्मसात केल्याची शक्यता रेल्वे सुरक्षा बलाकडून वर्तविली जात आहे. त्यानुसार तपासाला गती दिली जात आहे.
या व्हिडिओंवर कोणाचे नियंत्रण?माहिती, ज्ञानदानाच्या दृष्टीने इंटरनेटवर व्हिडिओ टाकले जातात. मात्र, त्यातून मिळणाऱ्या माहितीचा गैरवापर होत असल्याची शक्यता आता रेल्वेवर सुरू असलेल्या दरोड्याच्या सत्रांमुळे वर्तविली जात आहे. या व्हिडिओंवर कोणाचेही नियंत्रण नसल्याची परिस्थिती आहे.