- रऊफ शेख ।
फुलंब्री (औरंगाबाद ) : तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन मजुरांनी सणवार न पाहता ऐन दिवाळीच्या दिवशी दिवसभर रोजगार हमी योजनेच्या कामावर जाऊन घाम गाळला. ‘कसली दिवाळी अन् कसलं काय हातात फावडं घे आणि माती खोदायला जाय’ या ओळीप्रमाणे मजुरांना पोटाची खळगी भरण्यासाठी राबावे लागले.
फुलंब्री तालुक्यावर वरुणराजा रुसल्यामुळे खरीप पिके हातातून गेली आहेत. यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागला. आता रबीची आशाही जवळपास संपुष्टात आली आहे. त्यामुळे शेकऱ्यांसह मजुरांना हलाखीचे जीवन जगावे लागत आहे. शेतातही काम शिल्लक नाही, अशा परिस्थितीत उदारनिर्वाह कसा भागवायचा, असा सवाल प्रत्येक नागरिकासमोर उपस्थित झाला आहे.
अशा परिस्थितीत धानोरा येथील मजुरांसह शेतकऱ्यांना रोजगार हमी योजनेचा हतभार लागला आहे. धानोरा येथील एकाच गावातील शंभराहून अधिक मजूर भरदिवाळीच्या दिवशी राबताना दिसून आले. लोकमत प्रतिनिधीने धानोरा येथे भेट दिली असता दुष्काळ परिस्थतीमुळे या मजुरांवर सणाच्या दिवशीही पोटाची खळगी भरण्यासाठी काम करण्याची नामुष्की ओढावली. विशेष म्हणजे रोजगारसेवकाशिवाय दुसरा कोणीताच अधिकारी या कामाकडे फिरकला नसल्याचे दिसून आले.
येथील मजुरांशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले की, पावसाने दडी मारल्यामुळे खरीप हंगाम वाया गेला. आता रबीच्याही आशा संपुष्टात आल्या आहेत. एरवी हिवाळ्यात शेतात हाताला काम असायचे. मात्र, यावेळी दुष्काळाने पिकेच नसल्याचे शेतात रोजगार कसा मिळणार म्हणून आपला उदारनिर्वाह भागविण्यासाठी रोहयोचा मार्ग निवडला आहे. सध्या रोहयोमुळे हाताला काम असले तरी पुढील आठ महिने कसे जातील याबाबत मजुरांनी चिंता व्यक्त केली.