औरंगाबाद : शहरात अवघ्या पंधरा दिवसांपूर्वी सुरू झालेले वर्ग पुन्हा बंद झाले. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी, पालकांसह शिक्षकांची धाकधूक वाढली आहे. ऑनलाईनमुळे अध्ययनस्तर ३० टक्क्यांपेक्षा खाली आल्याने शाळा पुन्हा बंद झाल्या तर विद्यार्थ्यांचे नुकसान कसे भरून काढणार, अशी चिंता शिक्षकांना सतावत आहे.
ग्रामीण भागातील एकूण १२८ केंद्रांमध्ये पाचवी ते सातवीचे वर्ग ५ सप्टेंबरपासून सुरू झाले. कोरोनामुक्त क्षेत्रातील आठवी ते बारावीचे वर्ग प्रत्यक्षपणे जुलैपासून सुरू झालेले आहेत. आठवी ते बारावीच्या ग्रामीण भागात ९०७ शाळा असून ६३६ शाळांचे प्रत्यक्ष वर्ग ऑगस्टपासून सुरू आहेत. पहिली ते चाैथीचे वर्ग १ डिसेंबरपासून सुरू झाले. महिनाभरापासून ग्रामीण भागात पहिली ते बारावीचे वर्ग सुरू असून उपस्थिती ७०-७५ टक्क्यांपर्यंत पोहोचली. तब्बल दीड वर्षांनंतर जिल्ह्यातील ४,६०२ शाळांतील पहिली ते बारावीच्या वर्गांचे प्रत्यक्ष शिक्षण रुळावर येत असताना शहरातील रुग्णवाढीने खबरदारी म्हणून पहिली ते आठवीचे वर्ग अवघ्या १५ दिवसांत बंद करण्याचा निर्णय मनपा प्रशासकांनी घेतला.
खांडी पिंपळगाव शाळेचे शिक्षक कैलास गायकवाड म्हणाले, दीड वर्षानंतर सुरू झालेल्या शाळांत आता कुठे विद्यार्थी उपस्थिती वाढायला सुरुवात झाली आहे. उपाययोजनांची कडक अंमलबजावणी करून शाळा सुरू राहाव्यात. ग्रामीण भागातील शाळा पुन्हा बंद होतात की काय, या चिंतेने विद्यार्थी, पालक धास्तावले असल्याचे शिक्षक योगेश पाटील म्हणाले.
जिल्ह्यातील शाळातील विद्यार्थी उपस्थितीवर्ग - शाळा -पटसंख्याग्रामीण पहिली ते चौथी - २९२९ -२,२९,५७८शहर पहिली ते सातवी -७४६ -२,००,९९७ग्रामीण पाचवी ते बारावी -७०० -२,५०,४५१शहर आठवी ते बारावी -२२७ -४७,६००
ग्रामीण भागातील शाळा सुरू ठेवण्यासंदर्भात जिल्हाधिकारी निर्णय घेतील. शाळा, शिक्षकांनी कोरोना प्रतिबंधक सूचनांच्या काटेकोर अंमलबजावणीवर लक्ष द्यावे.- एम. के. देशमुख, शिक्षणाधिकारी, जि. प., औरंगाबाद