छत्रपती संभाजीनगर : शहराची तहान भागविण्यासाठी दररोज जायकवाडी धरणातून १३० ते १३५ एमएलडी पाण्याचा उपसा करण्यात येतो. या पाण्याचे बिल दरमहा जलसंपदा विभागाला भरावे लागते. मागील काही वर्षांपासून मनपाने पैसे भरले नाहीत. फेब्रुवारी महिन्यात जलसंपदा विभागाने ४० कोटींची थकबाकी भरावी म्हणून नोटीसही दिली होती. त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा विभागाकडून कोणत्याही क्षणी बंद केला जाऊ शकतो. काही वर्षांपूर्वी जलसंपदा विभागाने काही तास पाणीपुरवठा थांबविला होता.
जलसंपदा विभागाला पाणीपट्टीपोटी मनपाचे १५ कोटी रुपये थकीत आहेत. संबंधित विभागाने दंड आणि व्याज लावून ही रक्कम ४० कोटी केली, असे मनपातील सूत्रांचे म्हणणे आहे. दरवर्षी काही ठरावीक रक्कम मनपाकडून भरण्यात येते. व्याज आणि दंड मनपा भरू शकत नाही. जलसंपदा विभाग मूळ रक्कम आणि थकबाकीवर चक्रवाढ पद्धतीने व्याजाची आकारणी करीत आहे. जायकवाडी धरणातून पाण्याचा उपसा करण्यासाठी महापालिकेने करार केला आहे. करारात दरवर्षी किती रक्कम द्यावी, हेसुद्धा नमूद आहे. दर सहा वर्षांनंतर सुधारित करार करावा लागतो. मागील दोन ते तीन वर्षांमध्ये मनपाने जलसंपदा विभागाला ८ कोटींपेक्षा अधिक रक्कम अदा केली आहे.
३१ मार्चपूर्वी थकबाकी भरावी, असा आग्रह जलसंपदा विभागाने धरला होता. फेब्रुवारी महिन्यातच मनपाला नोटीसही बजावण्यात आली होती. मनपाकडून थकबाकी भरण्यात आलेली नाही. त्यामुळे जलसंपदा विभागाकडून कधीही कारवाईचा बडगा उगारण्यात येऊ शकतो. यापूर्वी जलसंपदा विभागाने मनपाला नोटीस देऊन दररोज काही तास पाण्याचा उपसाही बंद केला होता. ही नामुष्की टाळण्यासाठी मनपाने काही पैसे भरून कारवाई टाळली होती. आता पुन्हा जलसंपदा विभागाकडून अचानक अशा पद्धतीची कारवाई झाल्यास शहराचा पाणीपुरठा बंद होऊ शकतो. अगोदरच शहरात पाणीप्रश्न गंभीर बनला आहे.