औरंगाबाद : विद्यापीठाची परीक्षा म्हणजे गोंधळ ठरलेलाच. ही परंपरा विद्यापीठाने यंदाही कायम राखली आहे. कधी हॉलतिकिटांमधील चुका, ऐनवेळी बदललेले वेळापत्रक, सेंटर, एका बाकावर तीन-तीन परीक्षार्थी बसविणे, तर कधी चुकीचा पेपर. आता तर विधि अभ्यासक्रमाच्या परीक्षेत कॉप्यांच्या सुळसुळाटाने या गोंधळात आणखी भर टाकली. महाविद्यालयाने तर कॉप्यांवर नियंत्रण ठेवायलाच हवे; पण परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी नेमलेली भरारी पथके यावेळी नेमकी कुठे गायब होती, याचाही शोध आता विद्यापीठ प्रशासन घेणार आहे.
परीक्षा केंद्र असलेल्या डॉ. आंबेडकर विधि महाविद्यालयात बुधवारी दुपारच्या सत्रात ‘कंपनी लॉ’चा पेपर होता. यावेळी अनेक परीक्षार्थींनी सोबत गाईडस् आणले होते. महाविद्यालयाच्या स्वच्छतागृहात जाऊन काहीजण गाईडमधून उत्तरे शोधायचे व सोबत ती पाने घेऊन परीक्षा हॉलमध्ये जाऊन उत्तरे लिहायची. याबाबतचा एक व्हिडिओही व्हायरल झाला आहे. स्वच्छतागृहामध्ये उत्तरे शोधणाऱ्या परीक्षार्थींची गर्दी आणि कॉप्यांचा अक्षरश: पाऊस पडला होता.
विशेष म्हणजे, स्वच्छतागृहामध्ये गळ्यात चक्क ओळखपत्र अडकविलेले काही विद्यार्थी बिनधास्तपणे गाईडमधून उत्तरे शोधत होती. स्वच्छतागृहामध्ये सर्वत्र कागदच कागद विखुरलेले दिसत होते. उद्या हेच विद्यार्थी न्यायव्यवस्थेचे रक्षक बनणार आहेत. ते जर अशा प्रकारे कॉप्या करून पदवी मिळवत असतील तर... असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
भरारी पथकातील मंडळींवर होऊ शकते कारवाईविद्यापीठ परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. गणेश मंझा हे बुधवारच्या या प्रकाराविषयी अनभिज्ञ होते. ही बाब एकाही परीक्षार्थीने त्यांच्या निदर्शनास आणून दिली नाही. मात्र, परीक्षेसाठी नेमलेली भरारी पथके कुठे होती, याची माहिती घेतली जाईल व त्यांच्यावरही कारवाई होऊ शकते, असे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.