छत्रपती संभाजीनगर : प्रादेशिक पर्यटन विकास योजनेत एखाद्या कामांना मंजुरी द्यायची आणि नंतर ती रद्द करून अन्य कामांना निधी वळविण्याचा प्रकार सुरूच आहे. कायगाव येथील रामेश्वर मंदिराचा निधी आता इतरत्र वळविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. असाच निर्णय औंढा नागनाथ मंदिराबाबतीतही घेण्यात आला आहे.
पर्यटन स्थळांच्या ठिकाणी पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी प्रादेशिक पर्यटन योजनेंतर्गंत २०२२-२३ मध्ये जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील कायगाव येथील रामेश्वर मंदिर येथे घाट बांधणे आणि सुशोभीकरणासाठी दोन कोटींच्या निधीला प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. या कामासाठी ६० लाखांचा निधी वितरित करण्यात आला होता. मात्र, आता या कामाची प्रशासकीय मान्यताच रद्द करण्यात आली. त्याऐवजी नव्या कामासाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. आता या निधीतून मौजे शिवूर (ता. वैजापूर) येथील श्री शंकरस्वामी महाराज मंदिर प्रवेशद्वार ते श्री शंकरस्वामी महाराज मंदिर रस्ता, सार्वजनिक सभागृह व परिसरात सुशोभीकरण करण्यात येणार आहे.
४.९५ कोटींची ही कामे वळविलीऔंढा नागनाथ मंदिर (जि. हिंगोली) येथे पर्यटक सोयीसुविधा निर्माण करण्यासाठी ४.९५ कोटींच्या निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. मात्र, १९ ऑगस्ट रोजी ती रद्द करण्यात आली. आता या निधीतून भोसले चौक ते धुळे-सोलापूर रस्ता, श्री घृष्णेश्वर मंदिराकडे जाणारा एनएच-१२ च्या जंक्शनपासून वेरुळ, शिवाजी चौक रस्ता निर्माण करणे (ता. खुलताबाद), मौजे कुरुंदा (ता. बसमत, जि. हिंगोली) येथील तोकाई माता देवस्थान पर्यटनस्थळाचा विकास करण्यात येणार आहे.