औरंगाबाद - शिवस्वराज्य यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याची सुरूवात आज पैठण येथे संत एकनाथ महाराजांच्या समाधीचे दर्शन घेऊन झाली. त्यानंतर बाळानगर येथे झालेल्या पहिल्या सभेत राष्ट्रवादी काँग्रसेचे विधिमंडळ पक्षनेते आ. अजित पवार यांनी सभेला संबोधित करताना फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली. पूरस्थितीतही हे सरकार असंवेदनशील असून कसली टिंगलटवाळी चालली आहे, अशा शब्दात फडणवीस सरकारवर टीका केली. मंत्री गिरीश महाजन यांच्या सेल्फी वादावर बोलताना अजित पवार यांनी तीव्र शब्दात संताप व्यक्त केला.
महाराष्ट्रावर पूरस्थिती ओढावल्यानंतर अनेकांनी मदतीचा हात पुढे केला. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी तातडीने सांगली, सातारा, कोल्हापूरात काम सुरु केले. राष्ट्रवादीचे सर्वच नेते शक्यतोपरी मदत करत आहेत. पण, हे सरकार प्रचंड असंवेदनशील असल्याचे दिसून आले. पुरात माणसांचे प्राण गेले, आणि यांचे मंत्री फोटो काढत फिरले. ही कसली टिंगलटवाळी चालली आहे ? या सरकारला कसली मस्ती आहे ? असा प्रश्न पवार यांनी सरकारला विचारला.
सरकार असमर्थ असल्यामुळे अजूनपर्यंत सरसकट कर्जमाफी मिळाली नाही. शिवसेना पीकविमा कंपन्यांविरोधात मुंबईत आंदोलन करते. पण, त्यांना रब्बी व खरीप हंगाम कळत नाही. सरकारच्या काळात एअर इंडिया, बीएसएनएल, एमटीएनएल, एअरसेल अशा असंख्य कंपन्या बंद पडण्याच्या मार्गावर आहे. उद्योगपती आत्महत्या करत आहेत. महाराष्ट्रासाठी अलमट्टी धरणाचे पाणी सोडण्यासाठी योग्यवेळी निर्णय घेता आला नाही. मग, हे सरकर करतयं तरी काय? असेही प्रश्न अजित पवार यांनी उपस्थित केले.
तत्पूर्वी राज्यातील पूर परिस्थितीमुळे राष्ट्रवादीने नाशिक जिल्हयातील बागलाण येथे यात्रा स्थगित केली आली होती. आता पूरस्थिती निवळत असल्याने पुन्हा यात्रा सुरू करण्यात आली आहे. त्यावेळी, पैठण मतदारसंघातून यात्रेला प्रारंभ होताच, खासदार अमोल कोल्हेंनी शिवसेनेवर प्रहार केला. जनआशीर्वाद यात्रा घेऊन ते आले का नाहीत अजून ? असे म्हणत आदित्य ठाकरेंना लक्ष्य केलं. तसेच, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंना तुम्ही प्रश्न विचारा असे आवाहनही अमोल कोल्हेंनी उपस्थित पैठणकरांना केले.