औरंगाबाद : कोणाची काय लेव्हल,ते जनता ठरवते.. असा टोला 'मीच मोठा नेता' या शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या वक्तव्यावर आमदार संजय शिरसाट यांनी आज लगावला. शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर शहरातील 'शिवजागर' उत्सवाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
काही दिवसांपूर्वी माजी खासदार तथा शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी जिल्हाध्यक्ष अंबादास दानवे यांच्याशी माझी तुलना होऊ शकत नाही,अशी टिप्पणी केली होती. आज पत्रकार परिषदेत शिवसेना आमदारांना यावर प्रश्न विचारण्यात आला. यावेळी आमदार संजय शिरसाट यांनी तीक्ष्ण प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, चंद्रकांत खैरे, अंबादास दानवे किंवा मी असो, आम्ही सगळे एकाच पातळीवर असून सर्व शिवसैनिकाच्या भूमिकेत आहोत. याचा मला आनंद आहे, कोणाची काय पातळी आहे ते जनता ठरवते. खासदार, आमदार सर्व एकाच पातळीवर आहोत, असे मत व्यक्त केले.
तसेच तो खैरे यांचा विचार आहे. मी आमदार आहे म्हणून शिवसैनिकांना कमी समजायचा का? शिवसैनिकांमुळे मी आहे, मी सर्वांना एकाच पातळीवर समजतो, असा खोचक टोलाही शिरसाट यांनी यांनी यावेळी लगावला. तर जिल्हाध्यक्ष आमदार अंबादास दानवे यांनी, चंद्रकांत खैरे हे नेते आहेत, ते मोठे आहेत, असे मत मांडत या विषयावर जास्त बोलायचे टाळले.