- महेश मोरे
गेल्या किती तरी दिवसांपासून धुपू लागलं. त्याचे मन सारखं गावाकडं धावू लागलं. जीव मेटाकुटीला आला होता. त्याचं डोकं फटफट करू लागलं. शहरात मोठमोठी सुंदर घरं पण एकाही घरांनी त्याचं लक्ष ओढून घेतलं नाही. जवळच भला मोठा बगिचा पण त्याचं मन तिथं थोडंही फुललं नाही. शहराजवळून नदी वाहते पण त्या नदीच्या धारेत सुरूक मारावी असं त्याला वाटलं नाही.
आजची दुपार भयाण वाटत होती. त्याला या शहरातून केव्हा एकदा निघून जावं असं सारखं वाटत होतं. अवधूत जाधव शहराला कंटाळला होता. ते कायम विनाअनुदानित कॉलेज त्याला नको वाटू लागलं. त्या मोडक्या खुर्च्या, तुटकं फर्निचर, विटांनी भिंती रचलेल्या, कमरेत वाकलेल्या त्या खोल्या. आता त्यावर मरणकळा पसरली होती. तो कायम शब्द निघणारच नाही. अशा बातम्या वर्तमानपत्रातून झळकू लागल्या. पाच वर्षे नोकरी करून पाच रुपये मिळाले नाही. आपण अनुदानित कॉलेजला वीस लाख डोनिशन देऊ शकत नाही. घरूनच राशन आणायचं. जे काही पुढे आहे ते खायचं. आई-वडील तरी किती दिवस जगवणार. पगारच नाही तर पैसे कुठून येणार. सगळीकडून आर्थिक नाड्या आवळल्या गेल्या. बरं त्यातल्या त्यात मध्यवर्ती बँक बंद पडली.
शहरात जागोजागी पैसा लागतो. कधी तरी सहा महिन्याला गार्डनमध्ये फिरायला गेलो तर खिशात पैसे पाहिजेत. बायको भेळपुरी मागते, मुलगी आइस्क्रीम मागते. बरं फुकट काहीच नाही. टाक पैसे पी पाणी, अशी गत झालेली. शहरात कोणी व्यापारात गुंतलेलं. कोणी प्लॉटिंगच्या दलालाचं काम करीत असलेला. कोणी ब्लॅकनं रॉकेल विकतो. माणसांची लूट करणाऱ्या व्यवसायात कधीच उतरायचं नाही, असं त्यानं ठरून टाकलेलं. शहरात कोणी कोणाला बोलायला तयार नाही. अशात संवादच बंद होत चाललेला. शेजाऱ्याची शेजाऱ्याला ओळख नाही. नुसती दादागिरी, दहशत, कुठं दंगल, कुठे मारामारी, कुठे खुनं. या सगळ्या ताणतणावात जीव मुठीत धरावा लागतो. तो गुदमरून गेलेला. त्याचा जीव रंजीस आलेला.
शहरात सगळी महागाईच महागाई. सगळ्या वस्तू महाग होत चाललेल्या. कशाला हात लावायची सोय राहिली नाही. आता आपणाला चांगल्या पगाराची नोकरी लागत नाही. आपण काही या महागड्या शहरात तग धरू शकत नाही. एक तारीख झाली की घरमालक खोलीपुढे हजर. पैशाभोवती हे शहर फिरते. ही सम सम पाहणंच नको. मायला ही झेंगटच नको. अवधूतच्या स्वप्नांचा कोळसा झालेला. म्हणून त्यानं निर्णय घेतला. हे शहर सोडायचं. गावकडं जाऊन शेतीत नवनवीन प्रयोग करायचे. त्याने आपले सामान छोटा हत्ती टेम्पोत भरले. शहर सोडून अवधूत पानखेडमध्ये राहायला आला. आता काळ्या मातीच्या सेवेचा त्याला चांगला लळा लागलेला. सारखपटीत त्याचा जीव रमू लागला. अवधूत घरापुढच्या वट्ट्यावर बसून विचार करू लागला. त्यानं कंबरेला लुंगी गुंडाळलेली होती. त्याच्या अंगावर पांढरी बनेन, तिला कितीतरी बारीक बारीक भोकं पडली होती. पोटावर फाटलेल्या बन्यानीला तो हातानं झाकू-झाकू घेत होता.
शेतीची कामे तशीच राहिलेली. अजून नांगरणी नाही. उन्हाळपाळी नाही. इतक्यात धोतराचा चाळघोळ खोसत प्रल्हाद दूधवाला पुढून आलेला. ‘काय? नेट- सेटवाले अवधूत चिंतनम्! कोणता विचार करीत बसले नेट -सेटवाले’ अवधूत काही बोलला नाही. तो गालातल्या गालात हसला. पण प्रल्हादच्या काय नेट-सेटवाले या बोलानं अवधूत आतून- बाहेरून हादरून गेला. घडीभर भूकंपाचा धक्काच बसल्यासारखं झालं.
( maheshmore1969@gmail.com)