छत्रपती संभाजीनगर : सगेसाेयऱ्यांचा कायदा करावा आणि मराठा आंदोलकांवर दाखल गुन्हे रद्द करावेत, यासह अन्य मागण्यांसाठी मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिलेली एक महिन्याची मुदत शुक्रवारी संपली. मात्र, राज्य सरकारने जरांगे यांच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत. या पार्श्वभूमीवर जरांगे यांच्या महाशांतता रॅलीचा शनिवारी शहरात समारोप होत आहे. यावेळी जरांगे काय भूमिका घेतात, याकडे संपूर्ण राज्याचे आणि मराठा समाजाचे लक्ष लागले आहे.
२२ फेब्रुवारी रोजी मुंबईत मोर्चा नेल्यानंतर राज्य सरकारने सगेसाेयऱ्यांचा कायदा करणार असल्याचे आश्वासन देत एक अधिसूचना काढली होती. पण कायदा न केल्याने त्यांनी ८ ते १३ जून दरम्यान अंतरवाली सराटी येथे उपोषण केले. मंत्री शंभूराजे देसाई आणि छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी राज्य सरकारला एक महिन्याची मुदत द्या, अशी विनंती केल्याने जरांगे यांनी उपोषण सोडले होते. राज्य सरकारने मात्र, केवळ वेळकाढूपणा सुरू केल्याचे लक्षात येताच जरांगे यांनी ६ जुलैपासून मराठवाड्यातील विविध शहरांत महासंवाद आणि महाशांतता रॅली सुरू केली. प्रत्येक ठिकाणी मोठा जनसमुदाय सहभागी होत आहे. या रॅलीचा शनिवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये समारोप होत आहे. सकाळी ११ वाजता सिडकोतील वसंतराव नाईक चौक ते क्रांती चौक दरम्यान होत असलेल्या महाशांतता रॅलीची जय्यत तयारी सकल मराठा समाजाने केली आहे.
मराठवाड्यात सहा महाशांतता रॅलीजरांगे यांच्या मराठवाड्यातील महाशांतता रॅलीला ६ जुलै रोजी हिंगोली येथून प्रारंभ झाला. शुक्रवारपर्यंत मराठवाड्यात सहा महाशांतता आणि महासंवाद रॅली अत्यंत शिस्तबद्ध आणि शांततेत पार पडल्या. प्रत्येक रॅलींना लाखोंच्या संख्येने समाजबांधवांनी प्रतिसाद दिला. एवढेच नव्हे तर अन्य समाजातील बांधवांनीही सहभाग नोंदविला.
कोपर्डीच्या घटनेला ८ वर्षे पूर्ण१३ जुलै २०१६ रोजी नगर जिल्ह्यातील कोपर्डी येथील मराठा समाजातील मुलीवर अत्याचाराची घटना घडली होती. या घटनेनंतर राज्यातील पहिला मराठा क्रांती मूक मोर्चा छत्रपती संभाजीनगरमध्ये ९ ऑगस्ट २०१६ रोजी काढण्यात आला होता. या घटनेला शनिवारी ८ वर्षे होत असताना शनिवारी जरांगे यांच्या ‘महाशांतता रॅली’कडे समाजाचे लक्ष लागले आहे.