औरंगाबाद : महापालिका प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी शहरातील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी व्यापक उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्याचाच भाग म्हणून गुरुवारी शहरातील नऊ झोनमध्ये नऊ पथके कोणत्या वसाहतीमधील पाण्याचा व्हॉल्व्ह किती वाजता सुरू केला आणि किती वाजता बंद केला, हे पाहणार आहेत.
महापालिकेच्या सर्व नऊ झोनमध्ये पालक अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. यामध्ये झोन १मध्ये विद्युत विभागप्रमुख ए. बी. देशमुख, झोन २मध्ये उद्यान अधीक्षक विजय पाटील, झोन ३मध्ये उपायुक्त सोमनाथ जाधव, झोन ४मध्ये उपायुक्त संतोष टेंगळे, झोन ५मध्ये आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा, झोन ६- कार्यकारी अभियंता डी. के. पंडित, झोन ७- उपायुक्त अपर्णा थेटे, झोन ८- कार्यकारी अभियंता बी. डी. फड, झोन ९मध्ये उपायुक्त नंदा गायकवाड यांची नियुक्ती केली आहे.
पालक अधिकारी आपल्या पथकासह पाण्याची वितरण व्यवस्था, व्हॉल्व्ह व्यवस्थापन यावर लक्ष केंद्रित करणार आहेत. १२ मेपासून दररोज पालक अधिकारी यांनी पाणीपुरवठा वेळेस व्हॉल्व्हच्या ठिकाणी उपस्थित राहावे तसेच संबंधित लाईनमन वेळेवर व्हॉल्व्ह सुरू करतो का, किती वेळ व्हॉल्व्ह सुरू राहतो, यावर देखरेख ठेवावी, असे आदेशित केले आहे.