छत्रपती संभाजीनगर : वर्षभर बाजारपेठेत नवीन वस्तूंची खरेदी केली जात असते. मात्र, त्यातही साडेतीन मुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त असलेल्या ‘अक्षयतृतीये’ला आर्वजून खरेदी केली जाते. काय राव, मुहूर्तावर काय नवीन खरेदी करणार, सोने, गाडी, घर की मोबाइल, टीव्ही, असा प्रश्न एकमेकांना विचारला जात आहे. यामुळे या मुहूर्तावर बाजारपेठेत मोठी उलाढाल अपेक्षित आहे.
लग्नसराईला ब्रेक लागल्याने भर उन्हाळ्यात बाजारपेठेतील उलाढाल ‘थंड’ झाली होती. मात्र, अक्षयतृतीया आल्याने ग्राहकांच्या स्वागतासाठी व्यापारी सज्ज झाले आहेत. शुक्रवारी अक्षयतृतीया साजरी करण्यात येणार आहे. सराफा बाजारात आज सोने-चांदीचे भाव वधारलेले पाहण्यास मिळाले. ५०० रुपयांनी सोने वाढून ७१८०० रुपये प्रति १० ग्रॅम विक्री झाले तर चांदी १ हजार रुपयांनी वधारून ८५ हजार रुपये प्रतिकिलो विकली जात होती. अक्षयतृतीयेला तेजी-मंदी काय राहते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दुचाकी व चारचाकी बाजारातही मुहूर्तावर वाहन मिळावे, यासाठी आगाऊ नोंदणी करण्यात आली असून, मुहूर्तावर वाहन घेताच विधिवत पूजेची व्यवस्थाही काही शोरुममध्ये करण्यात आली आहे. सध्या तापमान वाढत असल्याने ‘एसी’ला तसेच आयपीएलमुळे मोठ्या स्क्रीनच्या टीव्हीला मागणी आहे. फोरजीला वैतागलेले मोबाइलधारक आता फाइव्हजी हँडसेट खरेदी करीत आहेत. अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर ५०० ते ८०० फ्लॅटची बुकिंग होईल, असा अंदाज बांधकाम व्यावसायिकांनी वर्तविला आहे.
‘करा-केळी’ची खरेदीअक्षयतृतीयेला पूर्वजांचे पितरांचे पूजन केले जाते. यासाठी करा-केळी (मातीचे भांडे), प्रतीक मानून त्यांची पूजा केली जाते. त्या करा-केळीत पाणी भरण्यात येते. पितरांना थंड पाणी मिळावे अशी त्यामागील भावना असते. यानिमित्त शहरात करा-केळी विक्रीला आल्या आहेत. गुरुवारी अनेकांनी या करा-केळी खरेदी केल्या.
चैत्रगौरीच्या हळदीकुंकवाच्या समारंभाची आज सांगताचैत्रगौरीनिमित्त मागील महिनाभरापासून घरोघरी हळदीकुंकूचे आयोजन केले जात होते. सुवासिनींना बोलवून त्यांना हळदीकुंकू करतात, त्यांची ओटी भरतात. हरभऱ्याची वाटलेली डाळ आणि पन्हे देतात. या हळदीकुंकवाच्या कार्यक्रमाची सांगता अक्षयतृतीयेला करण्यात येते.