योगेश पायघन
औरंगाबाद : शाळेत शिक्षकांनी शैक्षणिक कामे करून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा दर्जा संभाळला पाहीजे, अशी अपेक्षा असली तरी शिक्षणाव्यतिरिक्त ३६ ते ३७ प्रकारची कामे शिक्षकांना करावी लागतात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अध्ययन अध्यापनावर परिणाम होत आहे. त्यामुळे खिचडी शिजवणे, मुलांना वाटप करणे, सर्वेक्षण ही काय शिक्षकांची कामे आहेत का? असा सवाल शिक्षक संघटनांतून उपस्थित केला जात आहे, तर आपत्कालीन कामे, प्रत्यक्ष जनगणना, निवडणुकीशिवाय इतर अशैक्षणिक कामांतून शिक्षकांची सुटका व्हावी, अशी मागणी सर्वच शिक्षक आणि शिक्षक संघटनांकडून होत आहे.
शिक्षकांकडून केवळ शैक्षणिक कार्यच करून घ्यायला हवेत? असा निकाल अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिला आहे. हा निकाल देताना कोर्टाने शिक्षण अधिकार अधिनियम २७चा हवाला दिला आहे. मात्र, अध्यापनाशिवाय ३६ ते ३७ कामे शिक्षकांना करावी लागतात. खिचडी शिजवणे, मुलांना वाटणे ही शाळेची कामे असली तरी त्या शालेय पोषण आहाराची स्वतंत्र यंत्रणा उभी करावी. वर्षानुवर्षे ओळखपत्र, मतदार यादीचे पुनर्निरिक्षण, वेगवेगळे सर्वेक्षण या सर्व कामांना शिक्षकांना जुंपले जाते. कमी शिक्षकांच्या शाळेत निम्मे शिक्षक अशैक्षणिक कामांत गुंतले तर अध्ययन अध्यापनाचे काम प्रभावित होते.
.---
जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळा-२१३१
एकूण शिक्षक-९,०३२
विद्यार्थी संख्या-२,१७,८३१
---
शिक्षकांची कामे
-खिचडी शिजवून मुलांना वाटप करणे
-आधारकार्ड तयार करणे-शाळेची डागडुजी, रंगकाम
-आरोग्य विषयक विविध सर्वेक्षण
-कोरोना प्रतिबंधक उपाययोजना
-मतदार याद्या, ओळखपत्राचे पुनर्निरीक्षण
----
शिक्षण सोडून इतर कामांसाठीच प्रत्येक शाळेत किमान एक शिक्षक
खिजडी शिजवणे, जनगणना, बांधकाम, डागडुजी, रंगकाम, आरोग्य विभागाचे सर्व्हे, झाडे, कोंबड्या, स्वच्छता गृहांचे आकडे गोळा करणे, जंतूच्या गोळ्यांचे वाटप, लिंबोळ्या वेचणे, निवडणुकीचे काम, कोरोनाप्रतिबंधाची कामे इतर कामांसह वेगवेगळे अहवाल भरण्यासाठीच प्रत्येक शाळेत एक ते दोन शिक्षक आहेत.
----
७४ एक शिक्षकी शाळेचे हाल
जिल्ह्यात ७४पेक्षा अधिक एक शिक्षकी शाळेत शिकविण्यासह सर्वकामे एकाच शिक्षकाला करावी लागतात. दोन शिक्षकी शाळेत एक शिक्षक शाळाबाह्य कामांसाठी गुंतलेला असल्याने त्याही शाळा एक शिक्षकच बनल्या आहेत. त्यामुळे याचा परिमाण विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होत असल्याचे तेथील शिक्षकांचे म्हणणे आहे.
---
शिक्षक संघटना काय म्हणतात?
शिक्षकांकडे असलेली ३६ ते ३७ अशैक्षणिक कामे काढून घेतली तरच ज्ञानदान चांगल्या पद्धतीने शिक्षकांना करता येईल. दर्जेदार शिक्षण देता येईल. गेल्या पाच वर्षांपासून अशैक्षणिक कामे काढून घेण्यासाठी मागणी शिक्षक समिती करत आहे. एक शिक्षकी दोन शिक्षकी शाळांवरचे चित्र विदारक होत असून, त्याचा मुलांच्या शिक्षणावर परिमाण होत आहे.
-विजय साळकर, जिल्हाध्यक्ष, शिक्षक समिती
-----
जनगणना, प्रत्यक्ष निवडणूक आणि आपत्ती व्यवस्थापनातील कामे सोडून सर्व अशैक्षणिक कामांना सर्वांचाच विरोध आहे. ही कामे सर्व संघटनांनी स्वीकारलेली आहेत. चार शिक्षकांच्या शाळेत दोन शिक्षक अशैक्षणिक कामांत गुंतल्यास इतर शिक्षकांवर ताण वाढतो. परिणामी विद्यार्थ्यांच्या अध्यपनावर परिणाम होतो. त्यामुळे शिक्षण भारतीचा विरोध राज्यपातळीवर आहेच.
-प्रकाश दाणे, जिल्हाध्यक्ष, शिक्षक भारती
----
शिक्षणाचा अधिकारी अधिनियम २७ नुसार शिक्षकांना अशैक्षणिक कामे कायद्यानुसार देता येत नाही. शाळा व विद्यार्थ्यांच्या संबंधित कामे तसेच शालेय पोषण आहाराची कामे अशैक्षणिक म्हणता येणार नाही. तरी या कामांसाठी स्वतंत्र यंत्रणा असायला हवी. त्याशिवाय निवडणूक, जनगणणा, विविध सर्वेक्षणाची अशैक्षणिक कामांमुळे अध्ययन अध्यापनावर परिणाम होते.
-डाॅ. बी. बी. चव्हाण, शिक्षणाधिकारी, औरंगाबाद