औरंगाबाद : जिल्ह्यातील विधानसभेच्या ९ मतदारसंघांतून १५६ उमेदवारांनी एकमेकांना दिलेल्या तीव्र झुंजीचा निकाल लागण्याची वेळ येऊन ठेपली आहे. जिल्ह्यात राजेंद्र दर्डा, अब्दुल सत्तार व गंगाधर गाडे या तीन माजी मंत्र्यांसह, आजी-माजी आमदार, महापौर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, काही विद्यमान सभापती, सदस्य, पक्ष पदाधिकारी आदींच्या रोमहर्षक लढती झाल्या. या बहुरंगी लढतीत कुणी बाजी मारली, मतदारांनी कुणाला कौल दिला, याचा फैसला रविवारी दुपारी १ वाजेपर्यंत लागणार आहे.औरंगाबाद पूर्व मतदारसंघातील बहुरंगी लढत विशेष चर्चेची व राज्यात लक्षवेधी ठरली होती. तब्बल ३० उमेदवारांनी या मतदारसंघातून आपले भाग्य अजमावले आहे. त्यात काँग्रेसचे उमेदवार व या मतदारसंघाचे विद्यमान आमदार राजेंद्र दर्डा, शिवसेनेच्या उमेदवार व विद्यमान महौपार कला ओझा, भाजपाचे अतुल सावे, बसपाचे कचरू सोनवणे, ज्येष्ठ कामगार नेते कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार डॉ. भालचंद्र कांगो, राष्ट्रवादी काँग्रेसचे झुबेर मोतीवाला यांच्यासह मनसेचे सुमित खांबेकर, एमआयएमचे डॉ. अब्दुल गफार कादरी हे प्रमुख पक्षाचे उमेदवार आहेत. त्यात काँग्रेसचे बंडखोर, अपक्ष उमेदवार उत्तमसिंह पवार यांनीही रंग भरले. काँग्रेस, भाजपा, शिवसेना व एमआयएम या चार उमेदवारांचा मतदारसंघात बोलबाला होता. इतर उमेदवार प्रचारात सुरुवातीपासूनच पिछाडलेले दिसले. शिवसेनेचा गड मानला गेलेला औरंगाबाद पश्चिम या एससी प्रवर्गासाठी राखीव मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार व विद्यमान आमदार संजय शिरसाट यांची प्रतिष्ठा यावेळेस पणाला लागली आहे. ऐनवेळेस भाजपाची उमेदवारी घेऊन समोर आलेले मधुकर सावंत व एमआयएम पुरस्कृत पँथर्स रिपब्लिकन पार्टीचे गंगाधर गाडे हे या शर्यतीत आहेत. काँग्रेसने डॉ. जितेंद्र देहाडे यांच्या रूपाने नवाकोरा चेहरा मतदारांसमोर आणला होता. त्यांनी प्रचारात आघाडी घेतलेली होती. एकूण १८ उमेदवार रिंगणात असलेल्या या मतदारसंघातून बहुतांश पक्षाचे बंडखोर मैदानात होते. शिवसेनेचे जिल्हा परिषदेतील विरोधी पक्षनेते अनिलकुमार चोरडिया यांनी ऐनवेळेस पक्षाला सोडचिठ्ठी देऊन भाजपाचा रस्ता धरला. त्यामुळे बजाजनगरातील मतदार किती विचलित झाले, हे उद्याच स्पष्ट होणार आहे.औरंगाबाद मध्य मतदारसंघ तुल्यबळ उमेदवारांमुळे बराच गाजला. शिवसेनेचे विद्यमान आमदार व उमेदवार प्रदीप जैस्वाल यांना शिवसेनेतून बाहेर पडून भाजपामार्फत आव्हान देणारे किशनचंद तनवाणी यांची परंपरागत हिंदू व्होट बँक किती विस्कळीत झाली यावर मतदारसंघातील विजयाचे चित्र अवलंबून आहे. तनवाणी यांनी त्यांच्यासोबत या मतदारसंघातील शिवसेनेचे दोन नगरसेवकही सोबत नेले होते. त्यामुळे जैस्वाल यांना मतविभाजनाचा फटका बसू शकतो, तर दुसऱ्या बाजूला एमआयएमच्या झेंड्याखाली मुस्लिम मतदारांची मते एकवटल्याची जोरदार चर्चा त्या दिवशी घडवून आणली गेली. ते खरे की खोटे यावर उद्या मतदान यंत्रे उघडल्यावर शिक्कामोर्तब होईल. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेससह बसपा आणि मनसेच्या उमेदवारांचे आव्हानही कमजोर नव्हते. १८ उमेदवार मैदानात असल्यामुळे लढतीचे भवितव्य मतविभागणीवर ठरणार आहे. ग्रामीण भागातून सिल्लोड मतदारसंघाविषयी सर्वाधिक चर्चा झाली. तेथून काँग्रेसचे विद्यमान आमदार अब्दुल सत्तार यांचा दावा प्रबळ मानला जातो. त्यांना भाजपाचे सुरेश बनकर यांनी जोरदार टक्कर दिल्याची वार्ता पसरली आहे. गेल्या वेळेस सत्तार यांनी सुरेश बनकर यांचा पराभव केला होता. कन्नड मतदारसंघातून शिवसेनेचे विद्यमान आमदार हर्षवर्धन जाधव यांचा राष्ट्रवादी व काँग्रेसच्या तगड्या उमेदवारांशी संघर्ष होता. भाजपाचे उमेदवार डॉ. संजय गव्हाणे यांच्या नावाची विशेष चर्चा झाली नाही. यामागे नातेसंबंधाचे जाळे कारणीभूत असल्याची चर्चा या मतदारसंघात उघडपणे होत होती. फुलंब्री मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनुराधा चव्हाण यांनी स्वत:विषयी मोठी चर्चा घडवून आणण्यात यश मिळविले होते. या मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार व विद्यमान आमदार डॉ. कल्याण काळे यांनी हे आव्हान लीलया परतविल्याची मतदानोत्तर चर्चा आता सुरू झाली आहे. याच मतदारसंघातून भाजपाने माजी मंत्री हरिभाऊ बागडे यांना मैदानात उतरविले होते. बागडे यांचा डॉ. काळे यांनी दोनदा पराभव केलेला आहे. यावेळेस नाना यांनी विजयाचा दावा केला आहे.शिवसेनेचा पारंपरिक गड मानला गेलेला पैठण मतदारसंघ गेल्या वेळेस राष्ट्रवादीने हिसकावला होता. या वेळेस राष्ट्रवादीला ही जागा राखणे सोपे नव्हते. विद्यमान आमदार संजय वाघचौरे यांना शिवसेनेचे संदीपान भुमरे, काँग्रेसचे रवींद्र काळे, ऐनवेळेस शिवसेनेतून भाजपात जाऊन उमेदवारी मिळविलेले विनायक हिवाळे यांच्यासह जिल्हा परिषदेचे सभापती रामनाथ चोरमले, डॉ. सुनील शिंदे यांचे कडवे आव्हान होते. मत विभाजन हाच येथील विजयाचा पाया आहे. गंगापूर-खुलताबाद मतदारसंघाचे विद्यमान अपक्ष आमदार प्रशांत बंब यांनी वातावरणातील हवा पाहून ऐनवेळेस भाजपाच्या गोटात दाखल होत उमेदवारी मिळविली. त्यामुळे भाजपाला या मतदारसंघात चेहरा मिळाला, तर बंब यांना हक्काचा मतदार. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, राष्ट्रवादीचे कृष्णा पाटील डोणगावकर, काँग्रेस महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष शोभा खोसरे यांच्यात चुरशीची लढत झाली. ऐनवेळेस पक्षात येऊन उमेदवारी प्राप्त केल्यामुळे बंब यांच्याविरुद्ध भाजपा आणि औरंगाबादेत राहून गंगापूरची उमेदवारी मिळवली म्हणून दानवेंविरुद्ध स्थानिक शिवसेनेच्या कार्यकर्त्यांत धुसफूस होती. त्यामुळे येथील लढत गुंतागुंतीची झाली आहे.वैजापूर मतदारसंघातून १३ उमेदवार रिंगणात होते. भाजपाने जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधवांना मैदानात उतरविले, तर राष्ट्रवादीने भाऊसाहेब पाटलांना पुढे केले. पाटील व जाधव परिवारातील भाऊबंदकी तालुक्याला परिचित आहे; परंतु यावेळेस दोन्ही कुटुंबांतील भाऊ-भाऊ एक होऊन एकदिलाने लढले. काँग्रेसने पुन्हा दिनेश परदेशी व शिवसेनेने विद्यमान आमदार आर.एम. वाणी यांनाच पसंती दिली. त्यामुळे येथील लढाई मतदारांना परिचित अशीच होती. नात्यागोत्याच्या गुंफणात लढल्या गेलेल्या लढतीत काँग्रेसचे परदेशी हेच एकमेव त्या परिघाबाहेरचे आहेत. त्यामुळे मतविभागणीचा फायदा त्यांच्या पथ्यावर पडू शकतो की नाही, हे रविवारीच स्पष्ट होईल.
काय होणार? सर्वांनाच चिंता
By admin | Published: October 19, 2014 12:27 AM