'इथं काय गाठोडं ठेवलंय का'?; सोशल डीस्टसिंगचा फज्जा उडवणाऱ्यांना अजित दादांचा टोला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 12:06 PM2021-02-16T12:06:05+5:302021-02-16T12:09:32+5:30
Ajit Pawar अक्षरश: लोटालोटी व आरडाओरड्यात सोशल डिस्टन्सिंगचे भान हरपलेल्या व अर्धेअधिक विनामास्क येणाऱ्या कार्यकर्त्यांच्या अनेक शिष्टमंडळांनी सोमवारी सायंकाळी सुभेदारी विश्रामगृहावर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेतली.
औरंगाबाद : कोरोनाकाळात सर्वसामान्य जनता सरकारच्या सूचनांचे काटेकोर पालन करत असतांना राजकीय पक्षांचे कार्यकर्तेच ठिकठिकाणी गर्दी करत असल्याचा प्रत्यय थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सोमवारी आला. त्यामुळे या शिष्टमंडळांना उद्देशून त्यांनी ‘इथं काय गाठोडं ठेवलंय का’ असा टोला लगावला.
अक्षरश: लोटालोटी व आरडाओरड्यात सोशल डिस्टन्सिंगचे भान हरपलेल्या व अर्धेअधिक विनामास्क येणाऱ्या कार्यकर्त्यांच्या अनेक शिष्टमंडळांनी सोमवारी सायंकाळी सुभेदारी विश्रामगृहावर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेतली. वार्षिक नियोजन आराखड्याची बैठक सायंकाळी ५ वाजून १० मिनिटांनी संपल्यानंतर पवार यांचे विभागीय आयुक्त कार्यालयातून सुभेदारी विश्रामगृहावर आगमन झाले. तेथे आधीच अनेक शिष्टमंडळांची मोठी गर्दी झालेली होती. अनेकांच्या हातात मागण्यांची निवेदने व पवार यांच्या स्वागतासाठी पुष्पगुच्छ होते. सुभेदारीवर पोलीस बंदोबस्तही तगडा होता. अजित पवार यांचे आगमन होताच त्यांना भेटण्यासाठी लोटालोटी सुरू झाली. त्यामुळे पोलिसांनी प्रारंभी दरवाजे बंद करून घेतले नंतर शिष्टमंडळांना प्रवेश दिला जाऊ लागला तेव्हा पुन्हा लोटालोटी सुरू झाली. काहींनी आरडाओरड केली. रेटारेटीत सुरक्षित अंतराचा फज्जा उडवतच ही शिष्टमंडळे उपमुख्यमंत्र्यांना भेटली.
सायंकाळी सहा-साडेसहा वाजेपर्यंत एकानंतर एक शिष्टमंडळे भेटत राहिली नंतर त्यांनी पोलीस आयुक्त निखिल गुप्ता व पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्याशी चर्चा केली.सुभेदारीच्या मुख्य सभागृहातील बाजूच्या सूटमध्ये उभे राहूनच उपमुख्यमंत्र्यांनी ही निवेदने स्वीकारली. काही शिष्टमंडळे सभागृहातच पवार यांची वाट पाहत बसली होती. ‘इथं काय गाठोडं ठेवलंय का’ असा टोला मारत आतील शिष्टमंडळांनाही ते भेटले. संभाजी ब्रिगेड, मुप्टा, मराठवाडा विभाग ग्रंथालय संघ यांच्यासह विविध मागण्या घेऊन अनेक शिष्टमंडळे आलेली होती. या सर्वांची निवेदने उपमुख्यमंत्री पवार यांनी स्वीकारली. त्यांच्यासमवेत आमदार सतीश चव्हाण, जिल्हा व शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी होते. तत्पूर्वी पत्रकार परिषदेत पवार यांना पत्रकारांनी राजकीय मंडळीच अधिक गर्दी करत असल्याकडे लक्ष वेधले होते. त्यावर पवार यांनी मुंबईला गेल्यावर सर्व पक्षप्रमुखांना बोलून यावर काही उपाययोजना करण्याचा मानसही व्यक्त केला होता.