औरंगाबाद : जिल्ह्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष अस्तित्व शून्य असल्याचा दावा करून महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी मंगळवारी खळबळ उडवून दिली. कधी काळी नंबर एकवर असलेल्या या दोन्ही पक्षांच्या अवस्थेला भाजप जबाबदार असल्याचे सांगून आम्हीच भाजपला लवकरच खिंडार पाडू, असा शड्डूही ठोकला.
विभागीय आयुक्तालयात नियोजित आढावा बैठकीसाठी राज्यमंत्री सत्तार आले असताना त्यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शिवसेनेचे रोहयो मंत्री संदिपान भुमरे आणि महसूल राज्यमंत्री सत्तार हे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना धमकावत असल्याची तक्रार खा.सुप्रिया सुळे यांच्या समक्ष राष्ट्रवादी भवन येथे झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात सोमवारी (दि.१८) केली होती. यासंदर्भात सत्तार यांना पत्रकारांनी छेडले असता, ते म्हणाले की, टोपे यांच्या बोलण्याचा उद्देश काय होता मला माहिती नाही. त्यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सदस्य फोडण्याचा काय संबंध आहे. फोडण्यासारखे त्यांच्याकडे काय शिल्लक आहे? त्यांना काही मदत लागली तर आम्ही करू. त्यासाठी समन्वय बैठक घेऊ.
माझ्या तालुक्यात राष्ट्रवादीची ताकद कमी आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना असा वाद घालायचा नाही. त्यांनी त्यांचा पक्ष वाढवावा. ‘एक नंबर’वरून काँग्रेस, राष्ट्रवादी शून्यावर आले आहे. कारण भाजपने त्यांचे सगळे कार्यकर्ते, पदाधिकारी ओढून घेतले आहेत. निवडणुकांमध्ये त्यांच्या उमेदवारांचे डिपॉझिटदेखील जप्त झाले. दरम्यान रोहयो मंत्री भूमरे यांच्याशी याप्रकरणात संपर्क होऊ शकला नाही.
आता नजर भाजपकडेजिल्ह्यातील भाजपचे मोठे पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत येणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेची तारीख निश्चित झाली की, सगळे समोर येईल. आताच प्रवेश करणाऱ्यांची नावे सांगितली तर भाजपा नेते त्यांच्या घरी जाऊन विनवण्या करत बसतील. त्यामुळे वेळ आल्यावर सगळे काही जाहीर करेन. आगामी जि.प. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमच्या पक्षाची ताकद वाढविण्यासाठी रणनीती आखली जात आहे, असे राज्यमंत्री सत्तार यांनी स्पष्ट केले.
ती सभा कायदा-सुव्यवस्थेला बाधकमनसेप्रमुख राज ठाकरे यांची १ मे रोजी होणारी सभा कायदा आणि सुव्यवस्थेच्या अनुषंगाने योग्य नाही. त्यांचा अयोध्या दौरा राजकारण असल्याची टीका सत्तार यांनी केली.