औरंगाबाद : जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने व्हॉटस् अॅपच्या माध्यमातून जिल्ह्यातील ५ लाख ३० हजार शेतकऱ्यांपर्यंत बीटी कपाशीच्या भोवती नॉन बीटी कपाशीची लागवड करावी, ज्यामुळे बोंड अळीपासून संरक्षण मिळू शकेल, या आशयाचा संदेश पोहोचविण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.
या संदर्भात जि.प. कृषी विकास अधिकारी आनंद गंजेवार यांनी सांगितले की, जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कल हा कपाशी पिकाच्या उत्पादनाकडे अधिक आहे. गेल्या वर्षी बोंडअळीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेल्या वर्षी बीटी कपाशी भोवती नॉन बीटी कपाशीच्या सरी पेराव्यात, असे आवाहन केले होते; पण त्याकडे शेतकऱ्यांनी दुर्लक्ष केले. यंदा यासंदर्भात मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली.कृषी निविष्ठा विक्रेत्यांच्या मेळाव्यामध्येही या संदर्भात कृषी निविष्ठांची खरेदी करण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांना नॉन बीटी कपाशीच्या लागवडीसंदर्भात सांगण्यात यावे, असे आवाहन करण्यात आले.
व्हॉटस् अॅपच्या माध्यमातून जागृती यावर्षी व्हॉटस् अॅपच्या माध्यमातून बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संदेश पाठविण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. जिल्ह्यात नोंदणीकृत २ हजार ५०० कृषी सेवा केंद्र असून, यापैकी कार्यरत १५०० केंद्र आहेत.पेरणीच्या हंगामात या कृषी सेवा केंद्रांचा आणि शेतकऱ्यांचा जवळचा संबंध येत असतो. हे गृहीत धरून जि.प. कृषी विभागामार्फत कृषी सेवा केंद्रचालकांना व्हॉटस् अॅप संदेश पाठविला जाईल. तो संदेश पुढे कृषी सेवा केंद्रचालकांनी शेतकऱ्यांच्या मोबाईलवर फॉरवर्ड करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या आशयाचा पहिला संदेश सोमवारी व्हॉटस् अॅपद्वारे देण्यात आला आहे.