छत्रपती संभाजीनगर : संवादासाठी सर्वाधिक प्रमाणात वापरले जाणारे व्हॉट्सॲपचे करमणूक करणारे ग्रुप आता असुरक्षित झाले आहे. काही ग्रुपमध्ये अचानक एपीके (APK) फाइल शेअर होत आहेत. या फाइल इंस्टॉल करताच क्षणात मोबाइलचा ताबा सायबर गुन्हेगारांच्या ताब्यात जाऊन बँक खाते रिकामे होत आहे. शिवाय, मोबाइलमधील तुमचा खासगी डेटाही चोरला जात आहे. गेल्या तीन महिन्यांमध्ये जवळपास ३४ जणांनी सायबर पोलिसांकडे याप्रकरणी तक्रार दाखल केली.
६३ वर्षीय वृद्धाच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर अज्ञात क्रमांकावरून एसबीआय बँकेच्या नावे ॲप वापरल्यास १० हजारांचे अवॉर्ड मिळत असल्याचे मेसेज आले. फोटोसोबत एक एपीके फाइल होती. ती इंस्टॉल करताच मोबाइलचा डेटा सायबर गुन्हेगारांनी मिळवला आणि क्षणात बँक खात्यातून ३ लाख ७२ हजार रुपये लंपास झाले. गेल्या अनेक दिवसांपासून सायबर गुन्हेगारांचा हा नवा फसवणुकीचा प्रकार सुरू आहे. देशातील नामवंत बँक, प्रसिद्ध दागिन्यांच्या कंपन्या, ऑनलाइन शॉपिंगच्या डिस्काऊंट कोडच्या नावे या एपीके फाइल ग्रुपवर शेअर केल्या जात आहेत.
APK म्हणजे काय?ॲंड्राॅइड पॅकेज किट म्हणजे एपीके ओळखले जाते. हे अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टमद्वारे ॲप्लिकेशन्स इंस्टॉल करण्यासाठीची फाइल असते. एपीके फाइल हानीकारक नसली, तर त्याचा स्त्रोत मात्र अत्यंत धोकेदायक असू शकतो. प्ले स्टोर किंवा ॲपल स्टोअरवर खात्रीशीर ॲप असतात. मात्र, थेट लिंक, टेलिग्राम, व्हॉट्सॲप ग्रुपवर आलेल्या अशा APK फॉरमॅट मधील फाइल असुरक्षित असतात.
नेमके काय होते- तुम्ही एपीके ॲपवर क्लिक करताच ॲप इंस्टॉल होते. जे ॲप लिस्टमध्ये दिसत नाहीत.मोबाइल धारकाला अज्ञात स्त्रोतांकडून (फ्लॅश मेसेज) विविध मेसेज सुरू होतात. सदर ॲप कॅमेरा, मायक्रोफोन, लोकेशन, कॉन्टॅक्स, एसएमएस, गॅलरीची परवानगी मागते.- तुमचे सर्व मेसेज एका विशिष्ट नंबरला ऑटो फॉरवर्ड होतात.- अशा फाइल काही केबी (केबी) साइजच्या असतात.
हे आवश्य करा- व्हॉट्सॲपचे ऑटो डाउनलोड मोड कायम बंद ठेवा.- अनोळखी ॲप इंस्टॉल झाल्यास पहिले फ्लाइट मोड ऑन करा.- त्यानंतर डिव्हाइस फॅक्टरी रिसिट करा.- तत्काळ १९३० क्रमांकावर तक्रार नोंदवा.