औरंगाबाद : चिकलठाणा व रेल्वेस्टेशन औद्योगिक वसाहतीतील उद्योग सुरू करण्यास अखेर महापालिका प्रशासनाने हिरवा कंदिल दाखविल्यामुळे उद्योजकांचे चेहरे खुलले आहेत. आता दोन-तीन दिवसांत या परिसरातील कारखान्यांची यंत्रे गतिमान होतील.
‘लोकमत’ने मंगळवारच्या अंकात ‘मनपाच्या भूमिकेमुळे उद्योग सुरू करण्यास अडचण’, या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले. त्यानंतर मनपा प्रशासन खडबडून जागे झाले. शहरातील काही लोकप्रतिनिधींनी मनपाचे प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांच्याकडे नाराजी व्यक्त केली. वाळूज व शेंद्रा औद्योगिक वसाहतीतील उद्योग सुरू झाले. चिकलठाणा आणि रेल्वेस्टेशन परिसरातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम स्वरूपाचे उद्योग सुरू करण्यासाठी संबंधित उद्योजकांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रकारची खबरदारी घेण्याचे आश्वासन दिल्यानंतरही केवळ मनपा प्रशासनाच्या आडमुठेपणामुळे तेथील उद्योग सुरू होऊ शकले नाहीत. उद्योगमंत्र्यांनीही उद्योग सुरू करण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली आहे. यापुढे आणखी उद्योजकांच्या सहनशीलतेचा अंत बघितल्यास त्यांचा संयम सुटेल व ते रस्त्यावर उतरतील, ही बाब ‘मासिआ’ आणि काही लोकप्रतिनिधींनी पाण्डेय यांच्या निदर्शनास आणून दिली. तेव्हा त्यांनी रात्री उशिरा या दोन्ही उद्योगनगरीतील कारखाने सुरू करण्यासाठी सहमती दर्शविली. दरम्यान, ‘एमआयडीसी’ने सुरू केलेल्या पोर्टलवर गुरुवारी सुमारे ४०० ते ४५० उद्योजकांनी उद्योग सुरू करण्याची परवानगी मागण्यासाठी अर्ज केले आहेत. दोन दिवसांत ही परवानगी मिळेल व कारखाने सुरू होतील.
कामगारांना बसमधून ने-आण करण्याची परवानगी‘मासिआ’चे सरचिटणीस मनीष अग्रवाल म्हणाले की, चिकलठाणा आणि रेल्वेस्टेशन औद्योगिक वसाहतींमध्ये प्रामुख्याने सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग आहेत. अन्य औद्योगिक वसाहतींच्या तुलनेने येथे कामगारांची गर्दीही कमी आहे. तरीही प्रशासनाने कामगारांना बस किंवा चारचाकी वाहनांतून ने-आण करण्याच्या अटीवर परवानगी दिली आहे. ४दुचाकीला परवानगी नाकारली आहे. एक-दोन दिवसांत या परिसरातील सुमारे ४५० उद्योग सुरू होतील. उद्योजकांनी ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर कामगारांना फिजिकल डिस्टन्सिंंग, स्क्रीनिंग, सॅनिटायझर, मास्क आदी सुविधा पुरवठा करून खबरदारी घ्यावी, असे आवाहन अग्रवाल यांनी केले.