छत्रपती संभाजीनगर: शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे होते, तोपर्यंतच मातोश्रीला महत्व होतं. आता मातोश्रीला महत्व राहिलं नाही, यामुळे तेथे आता कोणीबी येतं-जातं असा टोला, जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे रोहयो आणि फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांनी आदित्य ठाकरेंच्या हैदराबादच्या दौऱ्याची खिल्ली उडविली.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भडकलगेट येथे डॉ.आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर भुमरे पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की, जिल्ह्यात अवकाळीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. मी स्वतः पाहणी करून नुकसानीच्या पंचनामाचे करण्याचे आदेश दिले होते. पंचनामे देखील पूर्ण झालेले आहेत, लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत मिळेल. मातोश्रीवर गेल्याने महाविकास आघाडी भक्कम होईल असे मला वाटत नाही असे नमूद करीत ते म्हणाले की, अडीच वर्ष महाविकास आघाडी चे सरकार होते. त्यांनी काय काम केले? एखादे तरी ठोस काम दाखवा, असा सवाल मंत्री भुमरे यांनी उपस्थित केलीा.
देशातील विरोधीपक्षांची एकजूठ करण्यासाठी महाविकास आघाडी ठाकरे गट युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे हे नुकतेच हैदराबादला जाऊन रेड्डीला भेटले आणि उत्तरप्रदेशात जाऊन अखिलेश यादवलाही भेटणार आहेत.याकडे लक्ष वेधले असता पालकमंत्री म्हणाले की, रेड्डीला भेटले काय आणि अखिलेश यादव ला भेटले काय? याने काहीच फरक पडणार नाही. शिवसेना-भाजप युती भक्कम आहे. महाविकास आघाडीने कितीही नाटक केली तरी काही फरक पडणार नाही. बाळासाहेब होते तेव्हा मातोश्रीला महत्त्व होते आता मातोश्रीला कोणीही जातं आणि कोणीबी येतं, असे नमूद करीत आदित्यच्या दौऱ्याची खिल्ली उडविली.