औरंगाबाद : माझा मृत्यू झाल्याचे बनावट प्रमाणपत्र नातेवाईकांनी कार्यालयात सादर केल्याने माझी नोकरी गेली. आता मला आत्मदहनाशिवाय पर्याय उरलेला नाही, असे निवेदन देऊन शुक्रवारी पोलीस आयुक्तालयात आलेल्या व्यक्तीस बेगमपुरा पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याचे मतपरिवर्तन केले.
पोलीस निरीक्षक प्रशांत पोतदार यांनी सांगितले की, गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळातील लिपीक मनोज आदेशराव कुलकर्णी (३५, रा. शिवजागृत मंदिर, एन. ९) यांनी बेगमपुरा पोलीस ठाण्यात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, त्यांचे निधन होऊन अंत्यसंस्काराचा खोटा स्मशान परवाना सादर करण्यात आला. तत्पूर्वी परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथे खोटा मिसिंग रिपोर्ट नोंदविण्यात आला होता.
माझ्या विरोधात खोटी कागदपत्र तयार करणाऱ्या नातेवाईकांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा, अन्यथा पोलीस आयुक्त कार्यालयासमोर आत्मदहन करेन, असा इशारा त्यांनी दिला होता. त्यामुळे माझ्यासह हवालदार शरद वाणी आदी पोलीस आयुक्तालयात लक्ष ठेऊन होतो. मनोज कुलकर्णी हे १२.३० वाजण्याच्या सुमारास पोलीस आयुक्त प्रवेशद्वाराजवळ हातात पिशवी घेऊन येताच त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्या पिशवीत बाटली आढळली. कुलकर्णी यांची मुख्यालयातील पोलीस उपायुक्त अपर्णा गीते यांची भेट घालून दिली. त्यानंतर त्यास बेगमपुरा पोलीस ठाण्यात आणून त्याचे मनपरिवर्तन केले. त्यांनी आत्मदहन रद्द करीत असल्याचे पोलिसांना लिहून दिले. त्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले.