केऱ्हाळा : राज्यातील पुढारी, राजकारण्यांचे वेगवेगळे स्वभावविशेष असतात. या सगळ्यांमध्ये केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा ग्रामीण बाज हा नेहमी उमटून पडतो. त्यांची बोलीभाषा त्यांच्या वागण्यातही अस्सल ग्रामीण ढब असल्याने ते लगेच लोकांमध्ये मिसळून जातात. सगळीकडे दाजी म्हणून परिचित असलेले दानवे हे आपल्या सासुरवाडीला आल्यानंतर त्यांना गावच्या पारावर काही वृद्ध सारीपाट खेळताना दिसले. हे पाहून त्यांनाही मोह आवरता आला नाही. मग काय मंत्री असल्याचे विसरून ते सारीपाट खेळण्यात रमले. आवडत्या दाजीला खेळताना पाहून सर्वजण अवाक् झाले.
सारीपाट हा खूप प्राचीन खेळ आहे. महाभारतात कौरव, पांडव ते खेळत असत. आताच्या तरुण पिढीला परिचित नसलेला हा खेळ ग्रामीण भागात अजूनही वृद्ध खेळतात. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे हे मतदारसंघात आल्यानंतर त्यांनी त्यांची सासुरवाडी असलेले सिल्लोडजवळील निल्लोडला जाण्याचा बेत आखला. दानवे सासुरवाडीत आले असता, त्यांना गावच्या पारावर काही वृद्ध मंडळी सारीपाट खेळत असल्याचे दिसले. त्यांनाही सारीपाट खेळण्याचा मोह आवरता आला नाही, ते थेट पारावर गेले. तेथे खेळणाऱ्या दगडूबा आहेर, कौतिक मगर, प्रभाकर खटाळ, किसन आहेर, कचरू आहेर, काकासाहेब आहेर, लक्ष्मण मगर या वयोवृद्ध मंडळीत सहभागी होत त्यांनी सारीपाट खेळायला सुरुवात केली. यामुळे सर्व गावकरीही अचंबित झाले.
चौकट
कार्यकर्ते, पदाधिकारी आश्चर्यचकित
रावसाहेब दानवे सारीपाट खेळत असल्याची माहिती ताबडतोब गावात पसरली. यामुळे नागरिकांनी ते पाहण्यासाठी गर्दी केली होती. आवडते दाजी सासुरवाडीत सारीपाटात रमल्याची चर्चा संपूर्ण मतदारसंघात दिवसभर सुरू होती. ते सारीपाट खेळत असताना त्यांच्यासोबत असलेले सिल्लोड भाजप तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर मोठे, सिद्धेश्वर साखर कारखान्याचे चेअरमन ईद्रिस मुलतानी, सुरेश बनकर, सुनील मिरकर हे आश्चर्याने नुसते पाहत होते.
.
फोटो :