पाटी-पेन्सील धरणारे हात भीक मागू लागतात तेव्हा....
---
चौका चौकात बाल भिक्षेकरी : सर्वेक्षणातून शोध, पुनर्वसनाची गरज, मोफत योजना लाभ देणार कोण?
---
औरंगाबाद : उघडी-नागडी ३ चिमुकले वाहनांच्या मध्ये उभे राहून रस्त्यावर वाहन चालकांकडून भीक मागत होते. सिग्नल सुटल्यावर जमा केलेले पैसे ती मुले उड्डाण पुलाखाली झोपलेल्या महिलेकडे नेऊन देत होते. तर कर्तापुरुष उड्डाणपुलाच्या खांबाला टेकून बीडी ओढत पुन्हा भीक मागण्यासाठी त्या चिमुकल्यांना खुणावत होता. हे दृश्य दिसले शहरातील क्रांतीचौक परिसरात. हाती पाटी-पेन्सील धरणारे हात भीक मागू लागतात तेव्हा हृदय पिळवटून जाते. जेव्हा आई-वडील, पालकच चिमुकल्यांना भिक्षेकरी, बालमजुरी करण्याला भाग पाडतात.
आर्थिक दुर्बलांसाठी आरटीईतून मोफत शिक्षण आहे. शालेय पोषण आहार आहे. बालगृह, बाल संरक्षण कक्ष, भिक्षेकरी गृह, शेल्टर आहेत. मात्र, कोणताही कागद नाही. त्याशिवाय योजनेचा पुढे होऊन लाभ देणार कोण ? हाही प्रश्नच आहे. या मुलांकडून पैसा कमवून घेण्यासाठी हे प्रकार शहरात सुरु आहेत. त्यातच शहरात भीक मागण्यासाठी मुलांची खरेदी झाल्याचे प्रकार समोर आले. त्यानंतर बाल भिक्षेकऱ्यांचे पालक शोधणार असून मुस्कान अभियान त्या बालकांचे पालक शोधतील असे बाल कल्याण समितीकडून सांगण्यात आले. त्यामुळे सर्वेक्षण, पुनर्वसनाची प्रक्रिया कधी सुरु होईल याकडे बाल हक्कासाठी लढणाऱ्यांचे लक्ष लागले आहे.
---
उड्डाणपूल, रेल्वेस्टेशन परिसरात कायमचे दृश्य
---
दुसरीकडे क्रांतीचौकात एक धडधाकट माणूस रस्त्याच्या दुभाजकावर बसून खेळणी, इतर सामान घेऊन दहा ते बारा वर्षीय मुलींना साहित्य विक्रीसाठी सिग्नल बंद झाल्यावर धावायला भाग पाडत होता. वाहनांच्या गर्दीत धोका पत्करुन चिमुरडे मुले, मुली केविलवाणे तोंड करुन इशाऱ्यांनी भीक देण्यासाठी गयावया करत होते. साहित्य खरेदीसाठी विनवत होते. असेच दृश्य रेल्वेस्टेशन, सिडको येथील चौकांत दिसून आले.
---
नागरिकांत सजगता गरजेची
---
कोणत्याही पद्धतीने आणि कोणत्याही कारणासाठी मूल खरेदी किंवा विक्री करणे हा कायद्याने गुन्हा आहे. कोणतेही मूल दत्तक देण्यासाठी किंवा घेण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. जर कोणी बेकायदेशीर पद्धतीने मूल दत्तक देणे, घेणे किंवा खरेदी-विक्री चोरी करत असतील तर हा कायद्याने गुन्हा आहे. अशा पद्धतीचे गुन्हे घडू नये. यासाठी नागरिकांनीही सजगता दाखवण्याची अपेक्षा बाल हक्कासाठी काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे.
---
बाल हक्क कोण मिळवून देणार ?
---
कोणत्याही बालकाच्या मानवी हक्काचे हनन होऊ नये यासाठी नागरिकांनी सजग राहणे आवश्यक आहे. तसेच सर्व स्तरावर जाणीव जागृती होणे गरजेचे आहे. पालकांनी आपल्या पाल्यावर लक्ष ठेवणे कर्तव्य आहे. बालहक्क रक्षणासाठी शासनाची बाल कल्याण समिती, महिला व बालकल्याण विभागासह विविध योजना आहेत. पोलिसांनी अशा आढळलेल्या बालकांना बाल कल्याण समितीसमोर सादर केले पाहिजे. त्यानंतर समिती पुढील निर्देश देते.
-रेणुका कड, कार्यक्रम समन्वयक, विकास अध्ययन केंद्र
---
भिक्षेकरी, बालमजुरी करणारे बालके पकडून त्यांना बालकल्याण समितीसमोर सादर केल्यावर त्या मुलांचे जगणे, सहभाग, शिक्षण, स्वातंत्र्य आदी बाल हक्कांचे संरक्षण करुन त्यांचे पुनर्वसन शक्य आहे. यंत्रणेशिवाय सुजाण नागरिकांनीही अशा मुलांची माहिती दिल्यास या कामाला गती मिळू शकते. शिवाय पालक असताना सक्षम नसल्याने बालमजुरी, बाल भिक्षेकरी बनलेल्या मुलांना बालगृहात ठेवले म्हणजे ती शिक्षा नाही याबद्दलही मानसिकता बदलली गेली पाहिजे.
-ॲड. रेणुका घुले, माजी अध्यक्ष, बाल कल्याण समिती
(दोन काॅलम फोटो आहे)