घोसला (औरंगाबाद) : एखाद्या मंत्र्याला काठीचा प्रसाद मिळतो म्हटल्यावर सर्वजणांच्या भुवया ताणल्या जातील. मात्र, हा प्रसाद महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar ) यांना मिळाला आहे. हा काही वादाचा किंवा भांडणाचा विषय नसून, रविवारी सायंकाळी बंजारा समाज बांधवांच्या लठमार होळीत सहभागी झाल्यानंतर वृद्ध महिलांनी सत्तार यांना काठीने हळूवार मारले. हा प्रेमळ प्रसाद आनंदाने स्वीकारून ते या होळीच्या महोत्सवात सहभागी झाले होते. हा उत्सव सोयगाव तालुक्यातील हनुमंतखेडा येथे साजरा झाला.
औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यात बंजारा समाज मोठ्या प्रमाणावर आहे. होळी धुलिवंदनाचा सण बंजारा समाजबांधव आठवडाभर साजरा करतात. दरवर्षी राज्यमंत्री अब्दुल सत्तार येथील वाडी वस्त्यांवर होळी साजरी करतात. राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी रविवारी सोयगाव तालुक्यातील वाडी वस्त्यांना भेटी देऊन बंजारा समाजाच्या पारंपरिक धुलिवंदन उत्साहात सहभागी झाले. सायंकाळी हनुुमंत खेड्यात ते गेले. होळीच्या निमित्ताने बंजारा पुरुष महिलांना रंग लावतात, तर महिला पुरुषांना काठीने मारतात. या प्रथेला राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनादेखील सामोरे जावे लागले. यावेळी पारंपरिक गीते सादर करून वृद्ध महिलांनी अतिशय गंमती-जमती करीत अब्दुल सत्तार यांना हळूवार काठी मारली. यावेळी उपस्थितांना हसू आवरता आले नाही.
सत्तार यांनीही हा प्रेमळ प्रसाद अत्यंत विनम्रपणे स्वीकारला व रीतिरिवाजाप्रमाणे त्यांना पैसेही दिले. हे दृश्य पाहून उपस्थित असलेल्या सर्वांमध्ये हास्यकल्लोळ उडाला होता. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजेंद्र राठोड, तालुकाप्रमुख प्रभाकर काळे, संघटक दिलीप मचे, जि. प. बांधकाम सभापती किशोर बलांडे, जि.प. समाजकल्याण सभापती मोनाली राठोड, पं. स. सभापती प्रतिभा जाधव, जि. प. माजी उपाध्यक्ष केशवराव तायडे, कृष्णा पा. डोंणगावकर, आदींसह बंजारा समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.