औरंगाबाद : टॅक्स न भरता आणि नियमांचे उल्लंघन करून धावणाऱ्या १२५ ट्रॅव्हल्सवर आरटीओ कार्यालयाने सलग तीन दिवस कारवाईचा बडगा उगराला. कारवाईसाटी स्वत: प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांसह २० निरीक्षक रस्त्यावर उतरले होते. तीन दिवसांत १२५ ट्रॅव्हल्सविरुद्ध केलेल्या कारवाईतून आरटीओ कार्यालयाच्या तिजोरीत ३४ लाख ६९ हजार ७८० रुपयांचा महसूल जमा झाला.
प्रादेशिक परिहवन अधिकारी संजय मेत्रेवार, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी रमेशचंद्र खराडे, मनिष दौंड यांच्यासह २० निरीक्षकांच्या पथकाने २३ ऑगस्ट रोजी रात्री १०.३० वाजता ट्रॅव्हल्सविरुद्ध कारवाई सुरु केली. यामध्ये टॅक्स थकविण्यासह फिटनेस यासह विविध बाबींची पडताळणी करण्यात आली. यात २३ ऑगस्ट रोजी ४५ ट्रॅव्हल्स, दुसऱ्या दिवशी २४ ऑगस्ट रोजी ४३ ट्रॅव्हल्स आणि गुरुवारी ३७ ट्रॅव्हल्सवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. या ट्रॅव्हल्सकडून जागेवरच टॅक्स भरून घेण्यात आला. बहुतांश बसमलकांनी लगेचच ऑनलाईन कर व चलान अदा करून गाड्या मार्गस्थ केल्या. परंतु काही मालकांनी कर भरणार नाही अशी भूमिका जाहीर केल्यामुळे अशा ट्रॅव्हल्स जप्त करून आरटीओ कार्यालयात उभ्या करण्यात आल्या.