वैजापुर (औरंगाबाद ) : येथील बाजार समितीतील कांदा मार्केटमध्ये आज सकाळी मोकळ्या कांद्याचा लिलावा करण्यात आला. याप्रसंगी व्यापाऱ्यांनी वीस ते पन्नास रूपये प्रती क्विंटल भावाने कांदा मागितल्याने संतप्त शेतकऱ्यांनी हा लिलाव बंद पडला. यानंतर शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत संपूर्ण बाजार समिती बंद पाडली.
सध्या बाजार समितीत लाल कांद्याला 500 ते 1000 रुपये क्विंटल असा भाव आहे. उन्हाळा कांद्यास दोनशे ते पाचशे रूपयापर्यंत क्विंटलला भाव असुनही आज वैजापुर कांदा मार्केटमध्ये वीस ते पन्नास रूपये प्रती क्विंटलने व्यापाऱ्यांनी कांद्याची खरेदी सुरु केली. यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप असुन जोपर्यंत भाव वाढवून मिळत नाही तोपर्यंत मार्केट सुरू न करण्याचा पवित्रा त्यांनी घेतला.
या प्रकरणी शेतकऱ्यांसोबत चर्चा करण्यासाठी तहसीलदार विनोद गुंडमवार, पोलिस निरीक्षक अनंत कुलकर्णी, बाजार समितीचे संचालक कांदा मार्केट मध्ये दाखल झाले आहेत.