वाळूज महानगर : एमआयडीसीने बजाजनगरातील मोरे चौकाचे रुंदीकरण व सुशोभिकरण करुन चौकातील वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली काढला. पण महाराणा प्रताप चौक, रांजणगाव फाटा, एनआरबी आदी चौकाला अतिक्रमणांचा विळखा पडल्याने या चौकाचे श्वास कोंडला आहे. या ठिकाणी वाहतूक कोंडी होऊन अपघाताच्या घटना घडत आहेत. त्यामुळे मोरे चौकाप्रमाणे इतर चौकाचे रुंदीकरण व सुशोभिकरण कधी करणार, असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
वाळूज औद्योगिक क्षेत्राकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील चौकात अनेक व्यवसायिकांनी अतिक्रमण करुन पोट भाडेकरु ठेवले आहेत. या पोटभाडेकरुंनी हातगाडी, पानटपऱ्या, रसवंती, हॉटेल आदी छोटे-मोठे व्यवसाय उभारले आहेत. या अतिक्रमणांमुळे चौकाचा श्वास कोेंडला आहे. वाहतूक कोंडी व अपघाताच्या घटना लक्षात घेवून एमआयडीसीने मोरे चौक व महाराणा प्रताप चौकाचे रुंदीकरण व सुशोभिकरणाचे काम हाती घेतले. जवळपास दीड कोटी रुपये खर्च करुन मोरे चौकाचे रुंदीकरण व सुशोभिकरणाचे काम केले. हा चौक दोन्ही बाजूने चांगलाच रुंद केला असून पादचाऱ्यांसाठी पर्यायी रस्ता तयार केला आहे.
त्यामुळे चौकात वाहतुकीला शिस्त लागली आहे. पण महाणारा प्रताप चौकाचे अजूनही नियोजनानुसार रुंदीकरण झालेले नाही. त्यामुळे या चौकात अजूनही वाहतूक कोंडीची समस्या कायम आहे. सायंकाळच्या वेळी वाहतूक कोंडीमुळे चौकातून मार्ग काढणेदेखील अवघड होऊन बसते. रांजणगाव फाटा व एमनआरबी चौकाची परिस्थितीही अशीच आहे. चौकाच्या चोहोबाजूने अतिक्रमण वाढल्याने रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे औद्योगिक क्षेत्रात ये-जा करणाºया उद्योजक, कामगारासह नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. या विषयी एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता भूषण हर्षे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र तो होऊ शकला नाही.