- विकास राऊत
औरंगाबाद : सिडकोतील वसंतराव नाईक चौकातील स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपुलावरील अर्धे पथदिवे वर्षभरापासून बंद आहेत. ते पथदिवे केव्हा लागणार याबाबत राज्य रस्ते विकास महामंडळ आणि मनपाकडे याचे काहीही उत्तर नाही. पुलाची देखभाल व दुरुस्ती कंत्राटदाराकडे आहे. त्यामुळे ती जबाबदारी रस्ते विकास महामंडळाची असल्याचे सांगून मनपाने हात वर केले आहेत. तर रस्ते विकास महामंडळ याबाबत उत्तर देण्यास तयार नाही.
वसंतराव नाईक कॉलेजपासून ५०० मीटर अंतरावर पथदिवे रोज लागतात. तेथून पुढील ५०० मीटर अंतरातील दिवे बंद असतात. याबाबत वारंवार आंदोलने करण्यात आली. गांधीगिरी करून मेणबत्त्यांच्या प्रकाशात वाहनांना मार्ग दाखविणारे आंदोलन काही युवकांनी केले. तरीही त्या पुलावरील अर्धे पथदिवे लागत नाहीत. पुलाचे काम मुंबईतील कंत्राटदार कंपनी जेएमसी इन्फ्रास्ट्रक्चरने केले आहे. पुलाची किरकोळ कामे बाकी ठेवून सदरील कंपनीने १९ जून २०१६ पासून त्या पुलाकडे ढुंकूनही पाहिलेले नाही. काही अतिरिक्त कामे कंत्राटदाराला दिली गेली, ती कामे अंदाजपत्रकाच्या स्कोपमध्ये नव्हती. त्या कामांना मंजुरी मिळाली.
सात वर्षांसाठी पुलाची देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी कंत्राटदाराकडे आहे. राज्य रस्ते विकास महामंडळाने कंत्राटदारावर मेहरबानी केलेली असताना पथदिव्यांचे काम त्याच्याकडून का करून घेतले जात नाही, असा प्रश्न आहे. याबाबत अधीक्षक अभियंता सुनील देशमुख यांच्याशी संपर्क केला असता ते मुंबईला बैठकीला होते. या विषयावर त्यांनी अधिक बोलणे टाळले.
उड्डाणपूल : - वसंतराव नाईक चौक, सिडको - अंदाजित खर्च- ५६ कोटी २५ लाख- एकूण लांबी - १००१ मी.- रुंदी - १४ मीटर- उंची - ५.५ मीटर - काम केव्हा सुरू झाले- १३ फेबु्रवारी २०१४- पूल वाहतुकीला खुला झाल्याची तारीख : १९ जून २०१६