शिक्षण : दहावीच्या परीक्षेपूर्वी की नंतर ; पालकांना पडला प्रश्न
योगेश पायघन
औरंगाबाद : दहावीनंतर काय, कोणत्या शाखेतील शिक्षणाकडे वळावे, यासाठी दहावीतील विद्यार्थ्यांची घेण्यात येणारी कलमापन चाचणी कधी होणार, याबद्दल अद्याप राज्य मंडळाकडून स्पष्टता नाही. त्यामुळे दहावी परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर झाले असताना कलचाचणी व अभिक्षमता चाचणी कधी होईल, याकडे पालकांसह विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.
दरवर्षी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी, बारावीच्या परीक्षा मार्च महिन्यात होतात. मात्र, गेल्यावर्षी दहावीचा भूगोल विषयाचा पेपर सुरु असतानाच सरासरी गुण देण्याचा निर्णय घेत पेपर रद्द करण्यात आला. त्यानंतर कडक लाॅकडाऊन, मिशन बिगीन अगेन ऑनलाईन शिक्षण आणि नंतर २४ नोव्हेंबरपासून नववी ते बारावीचे प्रत्यक्ष वर्ग सुरू झाले.
सध्या जिल्ह्यात दहावीच्या प्रत्यक्ष वर्गाला सर्वाधिक प्रतिसाद आहे. त्यात परीक्षांचे वेळापत्रक आल्याने बोर्डाकडून परीक्षांची तयारी सुरू आहे. एप्रिलमध्ये परीक्षा होणार असून कलचाचणी कधी होणार याकडे पालकांसह विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे. तर राज्य मंडळाकडून अद्याप सूचना नसून कदाचित परीक्षेनंतरही कलचाचणी घेण्यात येवू शकते, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
-राज्य मंडळाकडून सूचना नाही
कलचाचणीसंदर्भात अद्याप कोणत्याही सूचना राज्य मंडळाकडून मिळालेल्या नाहीत. कोरोनाचा शिरकाव पुन्हा होत असल्याने बारकाईने व सावधगिरीने परीक्षांचे नियोजन सुरू ठेवण्याच्या सूचना मिळाल्या असून त्यादृष्टीने परीक्षा घेण्याचे नियोजन सुरू आहे, असे बोर्डाच्या विभागीय सचिव सुगता पुन्ने यांनी सांगितले.
७ क्षेत्रांतील कल व क्षमतेचे मापण
कृषी, कला, मानवविद्या, वाणिज्य, ललितकला, आरोग्य व जीवविज्ञान, तांत्रिक आणि गणवेशधारी सेवांबद्दल विद्यार्थ्यांचा ओढा व क्षमता कोणत्या क्षेत्राकडे आहे. हे दहावीच्या परीक्षापूर्वी जाणून घेण्यात येते. त्यातून दहावीनंतरची दिशा ठरवण्यास विद्यार्थ्यांना मदत मिळते.