औरंगाबाद: राज्यातच नव्हे, तर देशात सर्वांत जास्त पीएच.डी.ची नोंदणी या विद्यापीठात झाली आहे. २०१७ नंतर २०२१ मध्ये पेट झाली. आता यूजीसीच्या नव्या गाइड लाइन्सनुसार पीएच.डी.साठी नव्या ऑर्डिनन्सची तयारी सुरू आहे. ऑर्डिनन्स तयार झाल्यावर पेट परीक्षा घेऊन पीएच.डी.ची संधी विद्यार्थ्यांना दिली जाईल, अशी माहिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी दिली.
२०१७ चे संशोधन आता पूर्ण होऊन त्या जागा रिक्त होत आहेत. सध्या रिक्त जागांची संख्या १०० पेक्षा जास्त नाही. सध्या जवळपास साडेचार हजार विद्यार्थ्यांची पीएच.डी.साठी विद्यापीठात नोंदणी असल्याचे कुलगुरू डॉ. येवले म्हणाले.
शिक्षकांनाही बायोमेट्रिक अनिवार्यचपीएच.डी. संशोधकांची बायोमेट्रिक हजेरी नोंदविली जाणार आहे. त्याचबरोबर वसतिगृहांतील विद्यार्थी, कर्मचारी, प्राध्यापकांसाठी बायोमॅट्रिक पद्धती सुरू करीत आहोत. वेतनही त्यासोबत लिंक केले जाणार आहे. पुढील ७-८ दिवसांत सर्वांची बायोमेट्रिक सुरू होईल. बायोमेट्रिकला विरोध करणाऱ्यांत नोंदणीकृत संशोधक विद्यार्थ्यांचा समावेश तुरळक आहे. विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार सोयी-सुविधा दिल्या जातील. मात्र, हा निर्णय मागे घेतला जाणार नाही. अनुचित प्रकार रोखण्याकरिता या उपयायोजना करणे अनिवार्य आहे, असेही कुलगुरू येवले यांनी सांगितले.