छत्रपती संभाजीनगर : गणेशोत्सवात अन्न व औषध प्रशासनाने दूध व दुग्धजन्य पदार्थ उत्पादक, मिठाई व नमकीन विक्रेते आदी आस्थापनांच्या तपासण्या करून नमुने पुणे येथे प्रयोगशाळेत पाठविलेले असून, त्याचा अहवाल अद्यापही कार्यालयास प्राप्त झालेला नाही.
खाद्यपदार्थांची अशीच गुणवत्ता जपली जाईल काय, असा सवाल नागरिकांतून उपस्थित होत आहे. आरोग्याच्या दृष्टीने गुणवत्तापूर्वक दूध व दुग्धजन्य पदार्थ उत्पादक, मिठाई व नमकीन मिळावे, यासाठी अन्न व औषधी विभागाच्या वतीने सणासुदीच्या काळात अधिक गतिमान केली जाते. कारण, दसरा-दिवाळी सणाला अधिक खरेदी केली जाते. काही संशयास्पद पदार्थ आढळल्यास त्याचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी प्रयोगशाळेला पाठविले जातात; पण अहवाल वेळेवर प्राप्त होत नाही, तोपर्यंत अशा प्रकारच्या आस्थापना विक्री करणारे पदार्थ विकून मोकळे होतात. ग्राहकांनी मिठाई घेताना वापराचा कालावधी बघून खरेदी करावी. ग्राहकांनी दुग्धजन्य पदार्थ, मिठाई यासारख्या अन्नपदार्थांची योग्य तापमानावर साठवणूक करावी.
गणेशोत्सवात अन्न व औषधी विभागाने २३ आस्थापनांची तपासणी करण्यात येऊन खवा, मोदक, मिठाई यासारख्या अन्नपदार्थांचे १९ नमुने घेण्यात आले. याचा विश्लेषण अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई घेण्यात येईल, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
प्रयोगशाळा सहा महिन्यांपासून बंदच...ऑडिट न झाल्याने छत्रपती संभाजीनगरची प्रयोगशाळा सहा महिन्यांपासून बंदच आहे. दरवर्षी नूतनीकरण व सेंट्रल बोर्डच्या वतीने पाहणी केल्यानंतरच ती कार्यान्वित होते. ही प्रयोगशाळा सुरू झाली तर अहवालासाठी थांबण्याचा त्रास होणार नाही, असे सूत्रांनी सांगितले.