औरंगाबाद : वाळूजला एमआयडीसीतर्फे वाढीव पाणीपुरवठ्याचा प्रस्ताव वर्षभरापूर्वी मंजूर झालेला आहे; मात्र निविदा मंजूर व्हायलाच एक वर्ष लागल्याने या उन्हाळ्यात तरी जनतेला एमआयडीसीचे वाढीव पाणी मिळण्याची शक्यता धुसरच आहे.
वाळूजला एमआयडीसीकडून वाढीव पाणीपुरवठ्याचा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर दप्तर दिरंगाईमुळे वर्षभरापासून हा प्रस्ताव अडगळीत पडला होता. ‘लोकमत’ने सविस्तर वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर महिनाभरापूर्वी जिल्हा परिषदेने वाढीव पाणीपुरवठा प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता दिली. प्रशासकीय मान्यतेनंतर निविदा मंजूर होण्याची प्रतीक्षा ग्रामपंचायतीला करावी लागली. नवीन जलवाहिनी व जलकुंभ उभारण्यासाठी सव्वाकोटी रुपयांचा निधी खर्च केला जाणार आहे. यापूर्वीची पाच कोटींची राष्ट्रीय पेयजल योजना कुचकामी ठरल्यानंतर ग्रामपंचायतीने एमआयडीसीकडून पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. एमआयडीसीकडून वाळूजला दररोज १४ लक्ष घनमीटर पाण्याचा पुरवठा केला जाणार आहे; मात्र यापूर्वीचा अनुभव पाहता गावात प्रत्यक्षात शुद्ध पाणीपुरवठा केव्हा होणार, असा सवाल उपस्थित होतो.
महिनाभरात पाणीपुरवठ्याचा ग्रामपंचायतीचा दावा
सरपंच सुभाष तुपे व ग्रामविकास अधिकारी एस.सी. लव्हाळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी तांत्रिक अडचणी व निविदा प्रकियेमुळे एमआयडीसीकडून पाणीपुरवठा झाला नसल्याची कबुली दिली. आता प्रशासकीय मंजुरी व निविदाही मंजूर झाल्यामुळे जलवाहिनी टाकण्याचे काम तात्काळ सुरू करून महिनाभरात एमआयडीसीला पाणीपुरवठा केला जाणार असल्याचा दावा त्यांनी केला. वाळूजला यापूर्वीच पाच कोटींची राष्ट्रीय पेयजल योजना मिळाली होती.
पदाधिकाऱ्यांची निष्क्रियता व खाबुगिरीने योजना वांझोटी ठरली व गावाला आज भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. सध्या गावात सार्वजनिक विहिरी, एमआयडीसी व बोअरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो. लोकसंख्येच्या तुलनेत पाणी कमी पडत असल्यामुळे ग्रामपंचायतीने वर्षभरापूर्वी वाढीव पाणीपुरवठा करण्यात यावा, यासाठी एमआयडीसीकडे प्रस्ताव सादर केला होता. एमआयडीसीकडून दररोज १४ लक्ष घनमीटर पाणीपुरवठा करण्यास मंजुरी देण्यात आली होती.
वाढीव पाणीपुरवठ्याचा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर ग्रामपंचायतीने गतवर्षी जुलै महिन्यात २ लाख रुपये अनामत रक्कम एमआयडीसीकडे जमा केली होती. अनामत रक्कम भरल्यानंतर या कामासाठी नवीन जलवाहिनी टाकणे व जलकुंभ उभारण्यासाठी तांत्रिक मान्यता मिळावी, यासाठी ग्रामपंचायतीकडून जिल्हा परिषदेकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता; मात्र प्रस्तावात त्रुटी असल्याचे कारण दर्शवून जि.प. प्रशासनाने सुधारित प्रस्ताव सादर करण्याचे आदेश ग्रामपंचायतीला बजावले होते.
गावातील गंभीर बनलेल्या पाणी प्रश्नाकडे ग्रामपंचायत गांभीर्याने लक्ष देत नसल्यामुळे नागरिकांत असंतोषाचे वातावरण आहे. गावात आठ ते दहा दिवसांआड पाणीपुरवठा होत असल्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असून, अनेकजण पदरमोड करून जारचे पाणी विकत घेऊन तहान भागवीत आहेत. गत तीन दशकांपासून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गाजत असून, याकडे स्थानिक प्रशासन डोळेझाक करीत असल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.