औरंगाबाद : मराठवाड्यातील जालना आणि नांदेड, लातूर जिल्ह्यांतील एकूण सहा मंडळे दमदार पावसाने चिंब झाली. बुधवारी सकाळपर्यंत विभागात ११.४५ मि. मी. पावसाची नोंद झाली. जालना जिल्ह्यातील पाच, नांदेड व लातूर जिल्ह्यांतील प्रत्येकी एका महसुली मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. विभागात कुठे दमदार तर कुठे रिमझिम असा पाऊस सध्या सुरू असून, ढगाळ वातावरण दोन दिवसांपासून कायम आहे.
जालना शहर ८६ मि. मी., भोकरदन ७८ मि.मी., राजूर ८० मि.मी., अन्वा ७० मि.मी., जाफ्राबाद ८५ मि.मी. या महसूल मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली. तसेच नांदेड आणि लातूर जिल्ह्यांतील एकेका मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. औरंगाबादसह विभागात कमी-अधिक पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी खरीप पेरण्यांना गती दिली आहे. एकूण सरासरीच्या तुलनेत विभागात पावसाची मोठी कमतरता आहे. सर्व विभागात दमदार पावसाची हजेरी झाल्याची नोंद न झाल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता अजून कायम आहे.
बुधवारी सकाळी ८ वाजेपर्यंत औरंगाबाद जिल्ह्यात ११.९४ मि.मी., जालना २२.५६ मि.मी., परभणी १२.०५ मि.मी., हिंगोली १७.०६ मि.मी., नांदेड १४.५७ मि.मी., बीड ३.४४ मि.मी., लातूर ९.०४ मि.मी., तर उस्मानाबाद जिल्ह्यात ०.९५ मि.मी. पाऊस झाला. विभागात आजवर अपेक्षित पावसाच्या तुलनेत ५५.८ टक्के तर वार्षिक सरासरीच्या तुलनेत फक्त ११.८ टक्के पाऊस झाला आहे. जूनच्या तिसऱ्या आठवड्यात मराठवाड्यातील बहुतांश मंडळांमध्ये पावसाने हजेरी लावली. औरंगाबाद, जालना व परभणी जिल्ह्यांतील काही मंडळात चांगला पाऊस झाला आहे. मात्र जलप्रकल्पांत अजून नोंद घेण्याइतके पाणी आलेले नाही.