औरंगाबाद : घरात अठराविश्व दारिद्र्य असतानाही मुलगी, मुलगा शिकला पाहिजे, यासाठी आई-वडील काबाडकष्ट करीत आहेत. पैसे नसल्यामुळे मुलाचा अकरावीचा प्रवेश थांबलेला असताना मुलीकडे मोबाईल आढळला. यावरून संतापलेल्या आईने ‘तुझे शिक्षण थांबवून लग्न करून टाकते,’ असे म्हटल्यामुळे मुलगी घाबरली. तिने कोणालाही न सांगता आत्महत्येसाठी थेट हर्सुल तलाव गाठला. तेथील सुरक्षा रक्षकांनी प्रसंगावधान राखत मुलीला थांबवून, दामिनी पथकाला बोलावून घेतले. या पथकाने तिच्यासह आईचेही समुपदेशन करीत पुढील अनर्थ टाळला. ही घटना बुधवारी दुपारी घडली.
हर्सुल परिसरात राहणारी १७ वर्षांची मुलगी दुपारी हर्सुल तलावाच्या भिंतीकडे जाताना दिसली. संशयावरून सुरक्षारक्षक राजेश गवळे व कैलास वाणी यांनी तिला अडविले. विचारपूस केल्यावर तिची मनस्थिती बिघडल्याचे लक्षात आल्याने त्यांनी दामिनी पथकाला कळवले. पथकाच्या उपनिरीक्षक सुवर्णा उमाप, निर्मला निंभोरे, संगीता दांडगे आणि सुमन पवार यांनी तत्काळ हर्सुल तलावाकडे धाव घेतली. पथक पोहचल्यानंतर त्यांनी मुलीचा ताबा घेत विचारपूस केली असता, ती आत्महत्या करण्यासाठी तलावावर आल्याचे स्पष्ट झाले. आर्थिक स्थिती खराब असल्यामुळे कोणाकडेही मोबाईल नाही, मात्र मुलीकडे महागडा मोबाईल आढळून आला. त्यामुळे आई तिच्यावर रागावली. त्यामुळे मुलीने थेट हर्सुल तलाव गाठला. दामिनी पथकाने समेट घडवून आणला. मायलेकीच्या चेहऱ्यावर हास्य उमटल्यानंतर दामिनी पथक तेथून निघाले.
मुलाच्या प्रवेशासाठी मदतसंबंधित कुटुंबातील मुलाचा अकरावीचा प्रवेश शुल्क भरण्यासाठी पैसे नसल्यामुळे थांबला होता. तेव्हा दामिनी पथकातील निर्मला निंभोरे यांनी संबंधित महाविद्यालयातील ओळखीच्या प्राध्यापकांशी संपर्क साधत मुलाला प्रवेश देण्याची विनंतीही केली. यानुसार गुरुवारी मुलाचा प्रवेश होणार आहे. तसेच मुलीला नर्सिंगचे शिक्षण देणार असल्याचेही आईने मान्य केल्याचे सूत्रांनी सांगितले.